तुळजाभवानी मंदिरासमोरील १६ बालभिक्षेकऱ्यांना प्रशासनाने घेतले ताब्यात | पुढारी

तुळजाभवानी मंदिरासमोरील १६ बालभिक्षेकऱ्यांना प्रशासनाने घेतले ताब्यात

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तुळजाभवानी मंदिरासमोर असणाऱ्या भिक्षेकरांच्या समस्येवर आढावा बैठक घेतली. यानंतर तातडीने या परिसरात कारवाई करण्यात आली. यात 16 बालकांना भीक मागताना प्रशासनाने ताब्यात घेतले.

जिल्हाधिकारी व तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉ. ओम्बासे यांनी सर्व संबंधित खाते प्रमुखांची बैठक घेतली होती. यापूर्वी झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला होता. याप्रसंगी त्यांनी तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कुमार बोंदर यांनी मांडलेल्या सूचना बैठकीमध्ये चर्चा करून याप्रकरणी सातत्यपूर्ण रेस्क्यू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पहिले रेस्क्यू सोमवारी दुपारी चार वाजता करण्यात आले.

याप्रसंगी 16 अल्पवयीन भीक मागणाऱ्या बालकांना ताब्यात घेण्यात आले. यात तहसील कार्यालय प्रशासन तुळजाभवानी मंदिर प्रशासन जिल्हा परिषद शिक्षण विभाग व तुळजापूर पोलीस प्रशासन यांच्याकडून संयुक्त कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 3 वर्षापासून 13 वर्षापर्यंतच्या बालकांचा समावेश आहे. यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी बालकल्याण समिती उस्मानाबाद यांच्यासमोर त्यांना हजर करण्यात आले.

या कारवाईदरम्यान दोन तास या मुलांना मंदिर कार्यालयाच्या इमारतीजवळ एकत्र बसवण्यात आले होते. प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आणि हे रेस्क्यू पार पाडले. तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या मुलांचा होणारा त्रास लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी भीक मागणाऱ्या या लहान मुलांच्या पालकांना देखील समज देण्यात आली. सदर पालक या परिसरात दिसून आले या मुलांच्या भिक मागण्याच्या कमाईवर हे पालक नशा करतात अशी तक्रार आहे याविषयी देखील चौकशी केली जात आहे. याप्रकरणी बालक कल्याण विभाग आणि बालकांच्या अनुषंगाने असणारे कायदे अभ्यास करून प्रशासनाला कारवाई करावी लागते त्यामुळे सदर कारवाई करण्यासाठी सुमारे दोन ते तीन तासांचा कालावधी लागला.

हेही वाचा

नांदेड : देगलूर येथे आज रात्री ‘भारत जोडो यात्रे’चे आगमन 

जळगाव : जावयाने सासूच्या डोक्यात घातली वीट

कोल्हापूर : कुरुंदवाडमधील जुन्या आठवणींनी डॉ. सुधा मूर्ती भारावल्या

 

Back to top button