धक्कादायक! परभणी जिल्ह्यांत अनेक पाळीव प्राण्यांची जीभ कापली, घातपाताचा प्रकार असल्याचा पशुसंवर्धन विभागाचा अंदाज
परभणी, पुढारी वृत्तसेवा : सेलू तालुक्यातील शिराळा येथे पाळीव प्राण्यांची जीभ कापण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांचा लम्पी आजाराशी कोणताही संबंध नाही. हा केवळ घातपाता किंवा खोडसाळपणे केलेला प्रकार आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रमोद नेमाडे यांनी केले.
डॉ. नेमाडे म्हणाले की, तालुक्यात गेल्या वर्षभरापासून पाळीव प्राण्यांच्या जीभ तुटल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शिराळा येथील केदारेश्वर शेजूळ यांच्या बैलाची जीभ तुटल्याच्या घटनेची माहिती सरपंचाकडून प्राप्त होताच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव अघाव, औषधीशास्त्र विभागाच्या प्रा. मिरा साखरे, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. एस. डी. चोपडे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. भगवान जावळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. संग्राम रमाणे यांच्यासह घटनास्थीळी जाऊन पाहणी केली होती. तेथील काही नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल अजूनही प्रलंबीत असून इतर प्राप्त अहवालानुसार हा आजार जीवाणू अथवा विषाणूचा संसर्ग नसल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला आहे. तसेच याचा लम्पी रोगाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिराळा तसेच राज्यातील पशुपालकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
बैलाच्या रोगनिदानासाठी पाठविलेल्या नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला असून, हा कोणताही संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे येथे यापूर्वी घडलेल्या घटना केवळ घातपात किंवा खोडसाळपणे केलेला आहे. अशा प्रकारच्या रोगाची लागण इतरत्र कुठेही नसल्यामुळे पशुसंवर्धन विभाग या प्रकरणाचा तपास करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविणार असल्याचेही डॉ. नेमाडे यांनी सांगितले.
हेही वाचा :

