शिंदे-भाजप सरकार मस्तीत काम करतेय : नाना पटोलेंचा घणाघात | पुढारी

शिंदे-भाजप सरकार मस्तीत काम करतेय : नाना पटोलेंचा घणाघात

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: राज्यात एकीकडे शेतकरी, तरुण जीवन संपवत असताना दुसरीकडे शिंदे- फडणवीस सरकार मस्तीत काम करीत आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता त्यांची मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.हिंगोलीत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार गोरेगावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पटोले म्हणाले की, राज्यातील मोठे प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात बाहेर गेल्याचे माहिती अधिकार कायद्यात उघड झाल्याचे भाजप सांगत आहे. परंतु लोकशाही व्यवस्थेला दाबून ठेवणारी भाजपची मंडळी माहिती अधिकार कायद्याची भाषा करीत असतील, तर ही शोकांतिका आहे. भाजप सरकार महाराष्ट्र विरोधी आहे, हे जनतेला कळाले आहे. खोटे बोल पण रेटून बोल, असा प्रकार सुरु आहे. राज्य सरकार स्वार्थी व अप्पलपोटी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राज्यात शेतीमालाला योग्य भाव नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. बेरोजगारीमुळे तरुणांच्या आत्महत्या होऊ लागल्या आहेत. यावर राज्य सरकार बोलण्यास का तयार नाही. राज्य सरकारकडून जनतेची लूट सुरु असून यातून राज्याची बदनामी होत आहे. मस्तीत राहणार्‍या या सरकारची राज्यातील जनताच मस्ती उतरवेल. भारत जोडो यात्रेमध्ये सर्वजण सहभागी होऊ शकतात. या यात्रेचे विरोधकांना राजकारण करू नये. देश तोडणार्‍यांना देश जोडता येणार नाही, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. या यात्रेच्या निमित्ताने देश जोडला जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button