पीक विम्यासाठी दिवाळीतच पुकारला एल्गार; कैलास पाटील यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच | पुढारी

पीक विम्यासाठी दिवाळीतच पुकारला एल्गार; कैलास पाटील यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 2020 मधील पीकविमा तातडीने मिळावा. त्याचीही मंजूर असलेली पूर्ण रक्‍कम मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. यावरुन शिवसेना विरुध्द भाजप यांच्यात एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपाचे फटाके फुटू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या पीकविमा व अनुदानाच्या रक्कमा खात्यावर जमा होईपर्यंत उपोषणातून माघार घेणार नाही, असे पाटील यांनी मंगळवारी जाहीर केले.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी पीकविमा कंपनीने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले. यावर अनेक शेतकरी न्यायालयात गेले. त्यावर सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी झाली. यानुसार साधारण साडेपाचशे कोटी रुपये शेतकर्‍यांना मिळणे अपेक्षित असताना केवळ 200 कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. हा प्रकार चुकीचा आहे. मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी, सततचा पाऊस यांसारख्या संकटांचा सामना करीत आहेत. पीक विमा कंपनी मुजोर असतानाही तिला ताळ्यावर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत नाही. यंदाही दिवाळीच्या दोन दिवस अगोदरपर्यंत अतिवृष्टी झाली. त्याची मदत घोषणा करुनही मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करुनही त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने यावर त्वरीत पावले उचलत शेतकर्‍यांना धीर द्यावा या मागणीसाठी सोमवारपासून (दि. 24) कैलास पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी उपस्थित राहून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या उपोषणात सहभाग नोंदवला आहे.

माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर , तालुका प्रमुख सतिशकुमार सोमाणी, माजी नगरसेवक राजाभाऊ पवार, आम आदमी पार्टीचे ॲड. अजित खोत, युवासेना जिल्हाप्रमुख तथा राज्य विस्तारक अक्षय ढोबळे, युवासेनेचे तालुकाप्रमुख वैभव वीर, रणजित महाडिक, तुळजापूर उपतालुकाप्रमख रोहित चव्हाण आदी उपस्थित होते.

या उपोषणावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भेट दिली. पीक विम्यावरून होत असलेली दिरंगाई व हलगर्जीपणा अयोग्य असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी खा. राजेनिंबाळकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

अडीच वर्ष बेइमानी केलेले लोक आता शेतकर्‍यांशी इमानदार असल्याचे नौटंकी करीत आहेत, अशी टिका भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली आहे. तर मालकांनी दिलेली स्क्रीप्ट न वाचता किमान आता तरी विमा कंपनीची वकिली बंद करा व शेतकरी हितासाठी पीकविम्याची पूर्ण रक्‍कम मिळण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रत्युत्तर शिवसेनेची नेते, माजी पंचायत समिती उपसभापती श्याम जाधव यांनी दिले आहे.

हेही वाचा 

देशभरातील विविध स्थानकांवरून सुटणाऱ्या १७७ प्रवासी रेल्वे गाड्या रद्द

चिखली, मोशी परिसरातील विनापरवाना फलकांवर कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गम भागातील पोलिसांसमवेत साजरी केली दिवाळी

Back to top button