जालना : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या  होणार | पुढारी

 जालना : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या  होणार

जालना; पुढारी वृत्तसेवा : मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना अखेर मुहूर्त सापडला आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 25 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यासाठी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सचिव व उपसचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. शासन धोरण 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण जाहीर करण्यात आले आहे.

यानुसार 2022 मध्ये होणार्‍या बदलीकरिता पदावतीची परिगणना 31 मे ऐवजी 30 जून 2022 पर्यंत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच 2022 मध्ये होणार्‍या जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलांसाठी शासन निर्णयात विहित केलेल्या कालावधीनुसार बदली प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.

ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याबाबत ग्रामविकास विभागाने प्रमाणे वेळापत्रक निर्धारित केले आहे. त्यात 11 ते 22 ऑक्टोबर अवघड क्षेत्रांची यादी प्रसिद्ध करणे, बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त याद्या प्रसिद्ध करणे, 21 ते 25 ऑक्टोबर रिक्त पदांची यादी अद्ययावत करणे,25 ते 28 ऑक्टोबर विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष संवर्ग भाग दोनचे फॉर्म भरणे, 29 ऑक्टोबर बदलीपात्र आणि बदली अधिकार प्राप्त याद्या पुन्हा जाहीर करणे आणि विशेषसंवर्ग एक व भाग दोन यांच्या याद्या जाहीर करणे, 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर शिक्षणाधिकार्‍यांकडे अपील करणे, 2 ते 5 नोव्हेंबर अपील मंजूर करणे किंवा नाकारणे, 6 ते 7 नोव्हेंबर मुख्य कार्यकारी अधिकार्‍याकडे अपील, 8 ते 10 नोव्हेंबर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यानी निर्णय 3 डिसेंबर रिक्त पदांची यादी प्रकाशित करणे, 4 ते 6 डिसेंबर बदली पात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे, 7 ते 9 डिसेंबर बदली पात्र बदली प्रक्रिया सुरू ठेवणे, 10 डिसेंबर रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे, 11 ते 13 डिसेंबर विस्थापित शिक्षकांच्या बदलीसाठी पर्याय भरणे, 14 ते 16 डिसेंबर विस्थापित शिक्षकांचा राउंंड विस्थापित शिक्षकांसाठी बदली प्रक्रिया राबवणे, 17 डिसेंबर रिक्त पदांची यादी जाहीर करणे , 18 डिसेंबर
बदली प्राप्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे, 19 ते 21 डिसेंबर अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरणे,
25 डिसेंबर अवघड क्षेत्रात राहिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे, 25 डिसेंबर आणि बदलीच्या आदेश प्रकाशित करण्यात येणार आहे.

दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, यासाठी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू, संजय हेरकर,अमोल तोंडे, बी. आर. काळे, दत्ता पुरी, योगेश झांबरे आदी
पदाधिकार्‍यांनी पाठपुरावा केला होता.

Back to top button