मशालीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल | पुढारी

मशालीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

गंगाखेड; प्रमोद साळवे : उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला धगधगती मशाल हे चिन्ह देण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर ठाकरे समर्थकांकडून स्वागत केले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिक मशाल पेटवून जल्लोष करत आहेत. सोशल मिडियावर तर मशाल चिन्हाच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेले आहे. आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिल्यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. आयोगाच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर तर ठाकरे समर्थकांनी धुमाकुळ घातला आहे. अनेक शिवसैनिकांनी मशाल आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो एडिड करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. व्हॉट्सअॅपला स्टेटस लावून तसेच फेसबुक, इंस्टाग्रामवर कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘उषःकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ हे स्फूर्तीदायक गीत, तसेच छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या मशाल चिन्हावर पहिल्यांदा निवडणूक लढविली होती तेव्हाचे फोटो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मशाल चिन्हावर केलेले भाषण व हाती घेतलेल्या मशालीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

गंगाखेडमधील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी

मराठवाड्यात औरंगाबादनंतर गंगाखेडला शिवसेनेची दुसरी शाखा स्थापन झाल्याचा इतिहास आहे. लोकसभा- विधानसभा निवडणुकांत गंगाखेड तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर गंगाखेड तालुक्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याची उघड भूमिका घेतली. यामध्ये खासदार संजय जाधव, परभणीचे आमदार राहुल पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाचा प्रभावही मोठ्या प्रमाणात तालुक्यावर आहे. तालुक्यातील एकही प्रभावी नेता सध्या तरी शिंदे गटात सामील झालेला नाही.

हेही वाचा :

Back to top button