बीड : अवैध ड्रायव्हिंग स्कूलचे वाहन जप्त; उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई | पुढारी

बीड : अवैध ड्रायव्हिंग स्कूलचे वाहन जप्त; उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई

बीड, पुढारी वृत्तसेवा :  बीड शहरासह जिल्ह्यात परवाना नसलेल्या ड्रायव्हिंग स्कूलचे पेव फुटल्याचे वृत्त दैनिक पुढारीतून प्रकाशित करण्यात आले होते. यानंतर शनिवारी सकाळी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी गेवराईत अशा अवैधरीत्या चालणार्‍या ड्रायव्हिंग स्कूलचे वाहन जप्त केले आहे. अशाच पद्धतीची मोहीम जिल्हाभरात राबविण्याची मागणी केली जात आहे.

जिल्ह्यात परवाना असलेल्या ड्रायव्हिंग स्कूलकडून नियमांचे उल्लंघन आणि अवैधरीत्या चालणार्‍या ड्रायव्हिंग स्कूलमुळे रस्त्यांवरील धोका वाढला आहे. या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देणार्‍यांना कसलाही अनुभव नसतानाही त्यांची नियुक्ती केली जात आहे. यामुळे प्रशिक्षण घेणार्‍याकडून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच या वाहनांवर ड्रायव्हिंग स्कूलचे वाहन असल्याबाबत स्पष्टपणे लिहिलेले नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे रस्त्यावर चालणार्‍या इतर वाहनांच्या चालकांना नेमका अंदाज येत नाही. या सर्व ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी या आशयाचे वृत्त दैनिक पुढारीतून गुरुवारी प्रकाशित करण्यात आले होते.

याची तत्काळ दखल घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने व त्यांच्या सहकार्‍यांनी गेवराई येथे अवैधरीत्या चालकाचे प्रशिक्षण देणार्‍या ड्रायव्हिंग स्कूलचे वाहन शनिवारी जप्त केले. या कारवाईमुळे अवैधरीत्या ड्रायव्हिंग स्कूल चालवणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रशिक्षण देणारा दुसराच

आरटीओ विभागाकडे ड्रायव्हिंग स्कूलचा परवाना घेताना प्रशिक्षकाची नोंदणी केली जाते. परंतु प्रत्यक्षात अतिशय नवख्या तरुणांना ही जबाबदारी सोपवण्यात येते. यामुळे जे चालक प्रशिक्षण घेतात, त्यांनाही अर्धवट ज्ञान मिळते, शिवाय अपघाताचा धोका वाढतो. अशा प्रकारावरही कारवाई करणे गरजेचे आहे. वेगमर्यादेचेही होते उल्लंघन वाहन चालवण्यास शिकत असलेल्या चालकांनी वेगमर्यादा कमी ठेवणे अपेक्षित आहे. परंतु रस्त्यावरून वाहन चालवताना याचे भान न ठेवता वेगमर्यादेेचे उल्लंघन केले जाते. अशा स्थितीत रस्त्यावरील इतर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

परवाना न घेता चालकाचे प्रशिक्षण देणे बेकायदेशीर आहे. अशा पद्धतीने कोणी प्रशिक्षण देत असेल तर ते त्वरित थांबवावे व रीतसर
परवानगी घ्यावी. तसेच परवानगी घेतल्यानंतर नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. गेवराईप्रमाणेच जिल्हाभरात तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

– गणेश विघ्ने, मोटार वाहन निरीक्षक,बीड

Back to top button