हिंगोली : मॉडर्न मार्केटवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नका: राजू चापके

हिंगोली : मॉडर्न मार्केटवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नका: राजू चापके

वसमत; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या जागेसाठी मॉडर्न मार्केटच्या नावाखाली लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांनी पत्रकार परीषदेत केला. यावेळी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, शिवसेनेचे वसमत विधानसभा संघटक रामकिशन झुंझूलडे, किसान सेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्रनाथ सोळंके, तालुका उपसंघटक सुनिल अंभोरे, बाबा अफूणे, बद्रीनाथ कदम, शिवराज यशवंते आदी उपस्थित होते.

यावेळी चापके म्हणाले की, जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वरदान ठरणार आहे. खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर हा प्रकल्प अवघ्या आठ महिन्यांमध्ये वसमत येथे आला आहे. या प्रकल्पासाठी शासनाने १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपये दिले आहेत.

वसमत येथील नांदेड- परभणी महामार्गावरील पूर्णा पाटबंधारेच्या ६५ एकर जागेवर हा भव्य प्रकल्प होणार आहे. परंतु लोकप्रतिनिधी तसेच नेते मंडळी त्यास विरोध करुन अडथळा निर्माण करीत आहेत. प्रकल्पाला विरोध म्हणजेच विकासाला विरोध प्रकल्प इतर ठिकाणी गेल्यास वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

वसमत येथे मॉडर्न मार्केट हा प्रकल्प खाजगी प्रकल्प असून त्यासाठी ६५ एकर जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली. मात्र, अद्याप या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उभारणी झाली नाही. त्यामुळे केवळ प्रकल्पाला नाव देऊन जागा अडवून ठेवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप चापके यांनी केला. मॉर्डन मार्केटच्या नावाखाली लोकप्रतिनिधी जागेच्या वादावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहेत, हे सर्वस्वी चुकीचे आहे.

वसमत येथे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया उद्योगाला वाव मिळणार आहे. तसेच सुमारे ५००० लोकांना उद्योगातून रोजगार मिळणार आहे. मात्र, विकासाच्या या बाबीकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करून विकासाच्या आड येऊ पाहत आहेत. वसमत तालुक्याच्या विकासासाठी या प्रकल्पासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहिला पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे चापके यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news