ललिता पंचमीला रेणूका गडावर कला आविष्कारांसह, सप्तसुरांची उधळण | पुढारी

ललिता पंचमीला रेणूका गडावर कला आविष्कारांसह, सप्तसुरांची उधळण

श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा : कुलस्वामिनी श्री रेणुकामाता मंदिराच्या प्रांगणात ललिता पंचमीचे औचित्य साधून संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले. त्यात अनेक नामवंत व ख्याती प्राप्त कलाकारांनी गायन, वादन, नृत्य आदी कला सरस्वती स्वरुपात असलेल्या रेणुकेच्या चरणी सादर करून आपली सेवा अर्पित केली. ललिता पंचमी निमित्त यापूर्वी अनुराधा पौडवाल, श्रीधर फडके, रवींद्र साठे, पं.शौनक अभिषेकी,अजित कडकडे, सारेगम फेम प्रसन्न जोशी अशा बड्या कलाकाररांनी आपली सेवा दिली आहे.

संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव व केदार शास्त्री यांच्या हस्ते देवीचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून संगीत रजनीचा शुभारंभ करण्यात आला. सर्व प्रथम किनवट येथील नटराज डान्स अकॅडमीच्या नेत्रा कंचर्लावार व अनघा कंचर्लावार यांनी भरतनाट्यम सादर केले. त्यांना सचिन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. रागेश्री जोशी यांनी अष्टविनायका तुझा महिमा मोठा व आई भवानी हा गोंधळ गायला, त्यांना रमाकांत जोशी यांनी तबल्यावर साथ केली.

पंकज शिरभाते यांचे व्हायोलिन वादन जगदीश देशमुख यांच्या तबला साथीने अधिक रंगतदार झाले. गायक सुरेश पाटील यांच्या निघालो घेऊन दत्ताची पालखी या भक्ती गीतावर रसिकांनी ठेका धरला. पंडित जसराज यांच्या शिष्या चेतना व अनघा यांनी गायलेले अभंग, देवी गीते, सुफी गायन व युगल बंदिनीने रसिकांवर मोहिनी घातली.

सारेगम फेम प्रसन्न जोशी यांनी जोग रागावर भजन व अभंग गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना उस्ताद रवी सातफळे यांच्या तबल्याची साथसंगत लाभली. संवादिनी वादक श्रीकांत पिसे व रवि सातफळ यांची जुगलबंदी रंगली. राहुल मानेकर यांनी वृंदावनी वेणू ही गवळण व रोडगा वाहिन तुला हे भारुड गाऊन रसिकांची मने जिंकली.

संजय जोशी यांनी राग मालिका, पवन कोरटकर यांनी देवी गीत, शशांक पांडे व भाऊसाहेब केंद्रे यांनी भारुड गायले.संगीत रजनीत असंख्य कलाकारांनी श्रद्धारुपी संगीत सेवा श्री चरणी समर्पित केली. भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचलन डॉ. मार्तंड कुलकर्णी व सुरेश पाटील यांनी केले .विश्वस्त संजय काण्णव यांनी आभार मानले.

हेही वाचा  

अन् विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थी…!

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यात थेट पाईपलाईनचे काम युद्ध पातळीवर

नागपूर: आईवरुन शिवीगाळ केल्‍याने रिक्षाचालकाकडून तरुणाचा खून

Back to top button