बीड : घटस्थापनेने श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्रौत्सवास प्रारंभ | पुढारी

बीड : घटस्थापनेने श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्रौत्सवास प्रारंभ

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्रौत्सवास सोमवारी सकाळी ९ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर व त्यांचे पती नवीन केल्लोड यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. सलग दोन वर्षानंतर कोरोनाच्या प्रादूर्भावानंतर यावर्षी खुल्या वातावरण नवरात्र महोत्सव साजरा होत असल्याने भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.

२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत श्री योगेश्वरी देवीचा नवरात्रौत्सव साजरा होत आहे. सोमवारी सकाळी मंदिरात घटस्थापना व महापुजेने महोत्सवास प्रारंभ झाला. अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर व त्यांचे पती नवीन केल्लोड यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली.

या महापुजेसाठी योगेश्वरी देवीचे मुख्य पुजारी सारंग पुजारी, योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव अ‍ॅड. शरद लोमटे, विश्वस्त राजकिशोर मोदी, अक्षय मुंदडा, भगवानराव शिंदे, माजी आ. पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, गिरधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, डॉ. संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा राम कुलकर्णी यांच्यासह पुरोहित, मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली. महाआरती नंतर भाविकांची योगेश्वरी च्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने सोमवारी दुपारी मंदिर परिसरात देवळा हनुमान महिला भजनी मंडळ, रेणुकाचार्य महिला भजनी मंडळ, आर्यवैश्य महिला भजनी मंडळ, जागृत महिला भजनी मंडळ यांचा संगीतमय भजनाचा कार्यक्रम सादर झाला. रात्री मुकुंदराज संस्थान चे प्रमुख ह.भ.प किसनमहाराज पवार यांचे कीर्तन होणार आहे. त्यांना मुकुंदराज भजनी मंडळ साथ करणार आहे. श्री.योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव अॅड. शरद लोमटे यांनी केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button