

आष्टी, पुढारी वृत्तसेवा : परळी- बीड- नगर रेल्वे हे स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्वप्न होते. मात्र त्यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने हे स्वप्न अधुरे राहिले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपनेत्या पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत या रेल्वेचा शुक्रवारी (दि.23) शुभारंभ होणार असल्याने लोकनेते मुंडे यांचे अधुरे स्वप्न पूर्ण होत असल्याचे आ. सुरेश धस यांनी सांगितले.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून परळी- बीड- अहमदनगर रेल्वेची बीडकरांना प्रतीक्षा होती. रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय,
कारखाने, कंपन्या येतील. इथल्या सुशिक्षित बेजरोगार आणि कामगारांच्या हाताला काम मिळेला असे जिल्हावासीयांना वाटत होते.
वर्षानुवर्षे बीडकरांचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही. स्व. लोकनेेते गोपीनाथराव मुंडे यांनी रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांचे जीवलग मित्र विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यामुळे त्यावेळी राज्य आणि केंद्राने रेल्वे प्रकल्पाचा अर्धा वाटा उचलावा, ही लोकनेते मुंडे यांची मागणी मान्य झाली. मात्र केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता नसल्याने मुंडे यांचे स्वप्न अधुरे राहिले.
दरम्यान दुर्दैवाने लोकनेते मुंडे यांचे अपघाती निधन झाले. यानंतर भाजपाची राज्यात आणि केंद्रातही सत्ता आली. सत्ता येताच आपल्या पित्याचे अधुरे पूर्ण करण्याचा जणू काय विडाच भाजप नेत्या पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे यांनी उचलला. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. यामुळेच नगर- बीड- परळी रेल्वे प्रकल्पाला हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन रेल्वे प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. रेल्वेचे बहुतांश काम झाले असून आष्टीपर्यंत तर प्रत्यक्ष रेल्वेची ट्रायलही झालेली आहे. शुक्रवारी (दि.23) पहिल्या टप्प्यात आष्टी- नगर रेल्वे सेवा सुरू होणार आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, खा.
डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत होत आहे.
यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास मोठ्या
संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आ.धस यांनी केले आहे.