जालना : जळगाव सपकाळ येथे लम्पी स्किनचा पहिला बळी | पुढारी

जालना : जळगाव सपकाळ येथे लम्पी स्किनचा पहिला बळी

जळगाव सपकाळ (जि. जालना) पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने लसीकरण मोहीम राबवली जात असली तरी लम्पी स्किन आजाराचा धोका अजुनही टळला नसल्याचे दिसत आहे. जळगाव सपकाळ पशुवैघकीय केंद्रा अंतर्गत येणार्‍या जळगाव सपकाळ गावात गुरुवारी (दि.२२) रोजी लम्पी स्किन आजाराने पहिला बळी घेतला आहे. येथील शेतकरी किरण संतुकराव सपकाळ यांचा बैल लम्पी स्किन आजारामुळे दगावल्याने परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

जळगाव सपकाळ पशुवैघकीय केंद्राअंतर्गत जळगाव सपकाळ, आडगांव, दहिगाव, हिसोडा, करजगांव, कल्याणी या गावातील नऊ हजार जनावरांपैकी आतापर्यंत नेमक्या किती जनावरांना लम्पी स्किन आजाराची लागण झाली आहे, याबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध झाली नाही. गुरुवारी सकाळी किरण संतुकराव सपकाळ यांच्या बैलाचा लम्पी स्किन आजाराने मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरील घटनेचा पंचनामा जळगाव सपकाळ येथील पशुवैघकीय दवाखान्याचे पशुवैघकीय अधिकारी राजेश पवार यांनी केले आहे.

जळगाव सपकाळ परिसरातील गावामध्ये लम्पी आजारग्रस्त जनावरे आढळल्यास पशुवैघकीय दवाखान्यास संपर्क करण्याचे आवाहन पशुवैघकीय अधिकारी राजेश पवार यांनी केले आहे. तसेच त्यांनी परिसरातील गावामध्ये लम्पी आजाराविषयी शोध मोहीम केली असता लम्पी आजाराचे जनावर आढळून आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button