औरंगाबाद : 200 पालांमधून आठ आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी वाटली खिचडी अन्… | पुढारी

औरंगाबाद : 200 पालांमधून आठ आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी वाटली खिचडी अन्...

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : अदालत रोडवरील पगारिया शोरूम फोडणार्‍या टोळीचा गुन्हे शाखा पोलिसांनी दीड महिन्यात पर्दाफाश
केला. आठ जणांच्या टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाल टाकून बांगड्या विक्रीचा व्यवसाय करणारे हे आरोपी आहेत. ते ज्या ठिकाणी राहतात, तेथे 200 पाल होते. त्यातून आरोपींना शोधणे
आणि त्यांच्या तावडीतून आरोपींना घेऊन जाणे पोलिसांना अवघड वाटले. त्यामुळे सामाजिक कार्य करीत असल्याचे दाखविण्यासाठी
पोलिसांनी खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला, पण हाही प्लॅन फसला. अखेर, दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकसाठी जाऊन बाहेर पडणाऱ्यांचा
पाठलाग करून एका-एकाला तपासून आरोपींना हेरले आणि तिघांना पकडले.

शिवा नागूलाल मोहिते (32), सोनू नागूलाल मोहिते (25, दोघे रा. विचवा, पो. सुरवाडा, ता. बोधवड, जि. जळगाव), अजय सीताराम चव्हाण (32, रा. धानोरी, पो. सुरवाडा, ता. बोधवड, जि. जळगाव), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यांतील सोनू मोहिते हा टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी, चोरीच्या पैशाने विकत घेतलेले 19.980 ग्रॅम सोने व एक लाख रुपये रोकड, असा चार लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

4 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांच्या टोळीने अदालत रोडवरील पगारिया ऑटो शोरूम टार्गेट केले होते. दोन सुरक्षा रक्षक असताना दरोडेखोरांनी शोरूम फोडून दोन तिजोऱ्या उचलून नेऊन गोलवाडी शिवारात फोडून 16 लाख रुपये लंपास केले होते. शहर
पोलिसांसाठी हा गुन्हा अतिशय आव्हानात्मक व क्लिष्ट स्वरूपाचा होता. मात्र, सहायक आयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव आणि उपनिरीक्षक अजित दगडखैर व अमोल म्हस्के यांनी तांत्रिक विश्लेषण करून टोळीचा पर्दाफाश केला.

पाच वाजता रेकी, मध्यरात्री चोरी

आरोपी 4 ऑगस्टला जळगावहून पुण्याला निघाले होते. ते वेगवेगळ्या दुचाकींनी जात असताना सोनू आणि त्याचा भाऊ शिवा मोहिते
अंदाजे चार वाजता औरंगाबादेत पोचले. शहरात पाऊस सुरू असल्याने ते बाबा पेट ?ोल पंपाजवळील उड्डाणपुलाखाली थांबले. तेथून फोना-फोनी करून ते पाच वाजेपर्यंत एकत्र आले. पाऊस सुरू असल्याने त्यांनी पुढे जाणे रद्द करून जिल्हा न्यायालयासमोरील फ्लायओव्हरखाली बस्तान मांडले. शोरूम फोडण्यात कुख्यात असणाऱ्या या टोळीने लगेचच पगारिया शोरूमची रेकी केली. मध्यरात्री 12 वाजता पुन्हा एकदा खात्री करून त्यांनी एक वाजता थेट शोरूम फोडले. पाऊण तासात ते दोन्ही तिजोर्‍या उचलून बाहेर पडले होते. त्या गोलवाडी शिवारात नेऊन फोडल्या.

सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषण …

ही टोळी सीसीटीव्हीत कैद झाली होती. पोलिस उपनिरीक्षक अजित दगडखैर व अमोल म्हस्के यांनी आरोपींची ओळख निष्पन्न होईल, असे फोटो एकत्र केले. सोबतच डम डाटा व तांत्रिक विश्लेषण करून पोलिस या शोरूम फोडणाऱ्या टोळीपर्यंत पोचले. त्यातून काहींची ओळख निष्पन्न केली. ही कारवाई अमोल म्हस्के, अजित दगडखैर यांच्यासह सहायक फौजदार रमाकांत पटारे, सतीश जाधव,
अंमलदार संजय राजपूत, नवनाथ खांडेकर, विजय घुगे, धनंजय सानप, संदीप तायडे, संजय नंद, विठ्ठल सुरे, सुनील बेलकर, संदीप राशिनकर, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, अजय दहिवाल, संजीवनी शिंदे, पूनम पारधी, आरती कुसळे यांच्या पथकाने केली.

अशी केली अटक …

आरोपी निष्पन्न झाल्यावर पोलिस त्यांच्या राहत्या ठिकाणापर्यंत पोचले. तेथे जवळपास दोनशे पाल टाकून अनेक कुटुंबीय राहत होते. त्यांच्यात घुसून आरोपींना शोधणे वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. त्यामुळे पोलिसांनी आरोग्य कर्मचारी म्हणून जाऊन एक-एक जण तपासावा, असा प्लॅन आखला. मात्र, सायंकाळच्या वेळी आरोग्य कर्मचारी आले कसे? अशी शंका घेऊन विरोध होऊ शकतो, असे
वाटल्याने हा प्लॅन रद्द केला. त्यानंतर खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला. अंदाजे दहा किलो तांडळाची खिचडी आणून वाटप सुरू केले, परंतु तेथे केवळ महिला व लहान मुले आली. त्यामुळे आरोपींचा शोध घेताच आला नाही. दुसऱ्या दिवशी पोलिस पथक मॉर्निंग वॉक करीत पालांच्या परिसरात गेले. तेथेच थांबून जे लोक दुचाकीवरून बांगड्या विक्रीसाठी बाहेर पडत आहेत, त्यांच्यावर नजर ठेवली. फोटो असल्याने संशयितांचा पाठलाग केला. त्यातून एकजण फुटला व आरोपींना पकडता आले.

पाच आरोपी फरार …

अभिषेक देवराम मोहिते (19), जितू मंगलसिंग बेलदार (24, दोघे रा. धानोरी, ता. बोदवड, जि. जळगाव), विशाल भाऊलल जाधव (22), बादल हिरालाल जाधव (19, दोघे रा. बाजारपट्टीजवळ, जुनागाव, मुक्ताईनगर, जि. जळगाव), करण गजेंदर बेलदार (चव्हाण) (25, रा. दाभे पिंपरी, बुऱ्हाणपूर रोड, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) अशी फरार असलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.

कुणी घेतल्या म्हशी, कुणी कार

चोरीच्या या पैशांतून एका आरोपीने चार म्हशी घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले. या म्हशी विक्री करता येणार नाहीत, अशी नोटीस
पोलिसांनी बजावली आहे. एकाने प्लॉट घेण्यासाठी एक लाख रुपये इसार दिला होता. तर एकाने चक्क महागडी कार घेतल्याचे समोर आले आहे. ती कार गोवा व इतर ठिकाणी फिरून आल्याचेही तपासात समोर आले आहे. एकाने सोने खरेदी केले होते. ते पोलिसांनी जप्त केले आहे.

27 गुन्हे, 2019मध्ये शेवटी अटक

शोरूम फोडण्यात ही टोळी कुख्यात आहे. या टोळीविरुद्ध जळगाव शहर, भुसावळ, गुजरात आदी ठिकाणी तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत. यांतील 14 गुन्हे हे शोरूम फोडीचे आहेत. टोळीचा म्होरक्या सोनू व शिवा मोहिते यांच्याविरुद्ध वापी (गुजरात), जळगाव येथे तब्बल 14 गुन्हे आहेत. या टोळीला 2019 मध्ये शेवटची अटक झाली होती, अशी माहिती पोलिस निरीक्षक आघाव यांनी दिली.

Back to top button