

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील महातपुरी फाट्यावर एसटी आणि रिक्षाच्या भीषण अपघातात जवळपास ४० प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. एक तास चाललेल्या मदत कार्यामध्ये सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यास प्रशासनासह नागरिकांनी मोठे शर्तीचे प्रयत्न केले. याबाबतची अधिक माहिती अशी की, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहरापासून परभणी गंगाखेड कडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर एसटी आणि रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात एसटीच्या धडकेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.
या अपघातात एसटी मधील प्रवासी मालन शेख (वय ५५ वर्ष रा.गंगाखेड) लक्ष्मीकांत चिंतामणी सिसोदे (५० रा. इंदेवाडी ता परभणी), मजीद खान महबूब खान पठाण (४१ रा दैठणा), सोपान दिगंबर हरगुडे ( ५८ रा. गंगाखेड), सखाराम बाजीराव जाधव ( ८२ रा. गोंडगाव ता.गंगाखेड), मारुती काळबांडे ( ४० रा बोरी ता. हिंगोली) नागेश गंगाधर दोडे ( २९ रा सांगवी जि. हिंगोली) सना शेख सलीम ( २५ वर्षे रा.कुरुंदा ता. वसमत), अंकुश पारवे ( ५५ रा.इंजेगाव), अनुराग बचाटे ( ५० रा.धामणी), हनुमान राघोजी कुडे ( ३० वर्ष रा. कवडा ता कळमनुरी) दिगंबर मारोतराव घोगरे ( ५५ रा. सुपा ता गंगाखेड), गणेश गोविंदराव मोठे ( २४ रा. भुजबळ सावंगी ता. हिंगोली) नूरजहा बेगम खाना बेगम ( ४० रा गंगाखेड), गुलनाज बेगम खाजा बेगम ( ४० रा गंगाखेड), शहाणाज मिर्झा ( २१ रा गंगाखेड) अशी बस मधील प्राप्त झालेल्या जखमी प्रवाशांची नावे असून सदर प्रवाशांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.