औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : यंदा परतीचा पावसाने जिल्ह्यात दमदार एन्ट्री केली आहे. यामुळे सिल्लोड तालुक्यातील केळगाव लघू प्रकल्पानंतर पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो झाला आहे. यापाठोपाठ रहिमाबाद लघू प्रकल्पही ओव्हरफ्लो झाला असून तालुक्यातील हळदा- डकला लघू प्रकल्पही ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे.
जिल्ह्यात सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाला नाही. परंतु परतीचा पाऊस दमदार झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. तालुक्यातील अजिंठा – अंधारी, चारनेर – पेंडगांव, निल्लोड, उंडनगांव, याशिवाय घाटनांद्रा, धामनी – कासोद या गावातील जल साठ्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तालुक्यात सुरवातीला पावसाची कृपादृष्टी काही समाधानकारक झाली नाही. पण परतीच्या पावसामुळे तालुक्यातील नदी नाले तुडूंब वाहत आहेत. एकंदरीत परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामात पुरेशा प्रमाणात विहिरीत पाणीसाठा असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.