हिंगोली: आखाडा बाळापूर नगरपंचायतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर | पुढारी

हिंगोली: आखाडा बाळापूर नगरपंचायतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा: आखाडा बाळापूर नगरपंचायतीचा प्रस्ताव महसूल विभागाने शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठवला आहे. त्यामुळे आता नगरपंचायतीची घोषणा कधी होणार ? याकडे आखाडा बाळापूरकरांचे लक्ष लागले आहे. आखाडा बाळापूर गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी मागील अनेक वर्षापासून केली जात आहे. या संदर्भात वेळोवेळी आंदोलन देखील झाली. तसेच शासनाकडे आखाडा बाळापुर तालुका कसा होऊ शकतो, याबाबतचा आराखडा देखील सादर करण्यात आला होता. राज्यात इतर तालुक्यांच्या निर्मितीच्या वेळी आखाडा बाळापूरचा विचार केला जाईल, असे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते.

त्यानंतर आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. यावेळी शिंदे यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत प्रस्तावही पाठविण्याच्या सूचना महसूल विभागाला दिल्या होत्या. त्यानंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १५ सप्टेंबररोजी नगरपंचायत बाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्यामुळे आता आखाडा बाळापूर नगरपंचायतीच्या घोषणेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

३० सप्टेंबरपर्यंत नगरपंचायतची घोषणा न झाल्यास आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे ठाकूर सिंग बावरी, विनायक हेंद्रे, ओम ठमके, विष्णू आहेर, दिलीप मिरटकर, ओमकार अमाने, दिलीप देशमुख, तुकाराम पांडे, आनंद पंडित, ज्ञानेश्वर पतंगे, आनंद बलखंडे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button