लातूर : चित्त्यांचे आगमन; हरवलेले गतवैभव मिळवून देण्याची संधी | पुढारी

लातूर : चित्त्यांचे आगमन; हरवलेले गतवैभव मिळवून देण्याची संधी

लातूर; शहाजी पवार :  नामिबीयातून भारतात होत असलेले चित्त्यांचे आगमन ही येथील जैवविवधतेला हरवलेले गतवैभव मिळवून देण्याची संधी असून तिचे सोने करण्यासाठी सरकारने दीर्घकालीन चित्ता संवर्धन नियोजन करणे अनिवार्य आहे. माळरान हाच या जीवांचा खरा अधिवास असल्याने या पार्श्वभूमीवर देशातील महसुली माळरानांचे पुनरुज्जीवन करावे, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय वन्यजीव अभ्यासक
केदार गोरे यांनी व्यक्त केली.  उत्कट राजकीय इच्छाशक्ती काटेकोर नियोजन अन् भरीव निधी ही त्रिसूत्री प्रत्यक्षात आल्यास या राजबिंडया प्राण्यांचा वावर देशभर दिसेल असा विश्वासही केदार यांनी व्यक्त केला. चित्ता आगमनाच्या पार्श्वभूमीवर केदार यांच्याशी दै. पुढारीने संवाद साधला.

ते म्हणाले भारत सरकारचा हा निर्णय अतिशय चांगला असून त्याचे सर्वांनी स्वागत करायलाच हवे. तथापि हा निर्णय केवळ उत्साह- स्वागतापुरता सीमित न रहाता तो भारतीय जैवविवधतेला न्याय देणारा गवताळ प्रदेशाचे पुनरुज्जीवन करणारा ठरावा. गवताळ
प्रदेश हे स्वतंत्र जैवविविधतेचे आगार असूनही आजवर त्याच्या संगोपन अन् संवर्धनाकडे कुणी गांभीर्याने लक्ष पुरवले नाही. परिणामी
अनेक वन्यजीवांना आपणास गमवावे लागले. चित्त्याबाबतही हा अनुभव अधिक बोलका ठरला. आता हे गतवैभव चित्ताआगमनाने परत मिळवण्याची संधी आपणास लाभली आहे. त्यामुळे देशभरातील महसुली माळरांनाचा (गवताळ प्रदेश) नियोजनबध्द विकास शासनाने करावा. चित्ता प्रकल्पासाठी भरीव निधी , निधी उपलब्धता स्रोत याचे किमान वीस वर्षाचे पारदर्शी नियोजन हवे. हा निधी अन्य कामांत
विभागला जाऊ नये असा सल्लाही केदार यांनी दिला

या प्रकल्पाच्या संभाव्य आव्हानाबाबत सांगताना केदार म्हणाले, कुनोमध्ये मोठ्या संख्येत बिबटे आहेत. चित्त्याचे या अभयारण्यातील आगमन हे या दोन्ही प्राण्यांतील संघर्षाला कारण ठरू शकते तो घडू नये यावर लक्ष पुरवले पाहिजे. चित्त्यांचे खाद्य असलेले प्राणी तेथे मुबलक प्रमाणात असले पाहिजेत. भक्ष्यांच्या शोधात हे प्राणी कधीकधी सीमापार करून वसत्यांनी जाऊ शकतात तेथील बकर्‍या व अन्य
प्राणी यांची ते शिकार करू शकतात. हे ओळखून ज्या शेतकरी – पशुपालकांचे नुकसान झाले आहे. त्यांना चोवीस ते 48 तासांत त्याची भरीव भरपाई मिळाली पाहिजे. त्यासाठीचा निधी राखून ठेवला पाहिजे, असे झाले तर मानव-वन्यजीव संघर्ष फारसा उद्भवणार
नाही व चित्त्यालाही मानवापासून एकप्रकारे संरक्षण मिळेल. हा प्रकल्प पर्यटनाला निश्चितच चालना देईल तथापि हे आगमन केवळ पर्यटाना पुरते मर्यादित न ठेवता एक विशाल उद्देश व तशी दृष्टी ठेवून हाताळले तरच संधीचे सोने होईल, असे केदार म्हणाले.

राजा- महाराजांकरवी वन्यजीवांच्या शिकारी हा भारतीय जैवविविधतेला लागलेला शापच होता. ब्रिटिश काळात तर या प्रवृत्तीला उधाण आले होते. या बेबंद शिकारीने या प्राण्यांची संख्या रोडावली. शिकारीचा खेळ अन् आजाराने अनेक बंदीवान चित्त्यांना संपवले. 1947 मध्ये सरगुजा प्रांताचे (सध्याचे छत्तीसगड ) महाराजा रामानुज प्रतापसिंह यांनी अखरेच्या तीन चित्त्यांची शिकार केली अन् भारतातून हा प्राणी नामशेष झाला.

Back to top button