हिंगोली : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील घोटादेवी मंदिरात सेवेकऱ्याने भोजन कक्षात गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली. गजानन किशन जगताप (वय 32) असे सेवेकऱ्याचे नाव आहे. घटनास्थळी मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी सापडली असून त्यात मंदिर संस्थानचे कार्याध्यक्ष व सदस्यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. नवरात्र महोत्सवाच्या तोंडावरच घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील घोटादेवी येथे तुळजादेवीचे ठाणे आहे. या ठिकाणी देवीचे मोठे मंदिर असून दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. तर नवरात्र महोत्सवात या ठिकाणी मोठी गर्दी होते. सध्या या ठिकाणी नवरात्र महोत्सवाची तयारीही सुरू आहे. दरम्यान, या मंदिरात अनेक वर्षापासून साफसफाईचे काम जगताप कुटुंबाकडे आहे.
आज (बुधवार) पहाटे साडेपाच वाजता गजानन जगताप व त्यांची पत्नी मंदिरात साफसफाईसाठी गेले होते. यावेळी गजानन हे मंदिराच्या वरील भोजन कक्षात साफसफाई करीत होते तर त्यांची पत्नी मंदिराच्या परिसरात सफासफाई करीत होते. मात्र बराच वेळ होऊन देखील गजानन हे खाली आले नसल्याने त्यांच्या पत्नीने भोजन कक्षाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी गजानन यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्यानंतर घटनास्थळी गावकरी दाखल झाले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नर्सी नामदेव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण नागरे, उपनिरीक्षक रामराव पोटे, जमादार हेमंत दराडे, पांडूरंग डवणे यांचे पथक या ठिकाणी दाखल झाले. नवरात्र महोत्सवाच्या तोंडावरच हा प्रकार घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी घटनास्थळावर एक चिठ्ठी सापडली असून त्यात कार्याध्यक्ष व काही सदस्यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली असून त्यानुसार आता तपास केला जाणार आहे.
हेही वाचा