बीड : लंपी’ हातपाय पसरू लागला | पुढारी

बीड : लंपी’ हातपाय पसरू लागला

बीड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यामध्ये जनावरांना लंपी स्किन डिसीज या आजाराची मोठ्या प्रमाणावर लागण सुरू झाली आहे. सोमवारी परळी, वडवणी, पाटोदा व अंबाजोगाई तालुक्यात लंपीचा संसर्ग झालेली जनावरे आढळून आली. तर माजलगाव येथील नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत.

जनावरांमध्ये लंपी आजाराचा संसर्ग होऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील
जनावरांचे सर्व बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढलेले आहेत. तसेच जनावरांच्या वाहतूकीवरही बंदी घालण्यात
आलेली असताना लंपीचा फ ैलाव सुरूच आहे. सोमवारी परळी तालुक्यात सहा, वडवणीत एक व अंबाजोगाईत एक तर पाटोद्यात दोन
जनावरांना लंपीचा संसर्ग झाल्याचे समोर आले. माजलगाव येथील संशयित जनावराचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात
आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी विजय देशमुख यांनी सांगितले. परळी तालुक्यातील नागापूर वैद्यकीय
केंद्रांतर्गत काही लंपी स्कीनसदृश नमुने आढळून आले आहेत. याबाबत पशु मालकांना उपाययोजना करण्याबाबत जनजागृती करण्यात
येत आहे. तसेच लसीकरण करण्यात येत आहे. लंपी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित जनावरांची हालचाल पूर्णपणे बंद
करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जनावरांच्या गोठ्यामध्ये विशेष काळजी घेऊन याचा संसर्ग रोखणे अत्यंत आवश्यक आहे, असे डॉ.
हरिदास पांडे यांनी सांगितले.

ज्या जनावरांना लंपीचा संसर्ग झाला आहे, त्या जनावरांना 21 दिवस इतर जनावरांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. तसेच गोठ्यात
कीटकनाशक फ वारणी करावी. तसेच परिसरात वाढलेले गवत असेल तर त्या गवतावरही फ वारणी करावी. यामुळे कीटकांचा बंदोबस्त
होऊन लंपीचा प्रसार रोखता येऊ शकेल.

20 डॉक्टर्स जिल्ह्यात दाखल

जिल्ह्यात लंपीचा संसर्ग वाढत असताना पशुसंवर्धन विभागाचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागातील इतर कर्मचार्‍यांनाही तपासणी, लसीकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणारे तसेच पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे 20 भावी डॉक्टर्स बीड जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यांच्या माध्यमातूनही उपचार व लसीकरण केले जाणार असल्याची माहिती विजय देशमुख यांनी दिली.

23 पैकी 20 जनावरे ठणठणीत

जिल्ह्यात प्रारंभीच्या टप्प्यात 23 जनावरांना लंपीचा संसर्ग झाला होता. त्या सर्व जनावरांवर औषधोपचार करण्यात
आले. यातील 20 जनावरे पूर्णपणे बरे झाले असून तीन जनावरांवर अद्याप उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात अद्याप एकाही जनावराचा मृत्यू लंपीमुळे झालेला नाही

Back to top button