औरंगाबाद : पावसामुळे नाथसागर धरणाचे १८ दरवाजे दोन फुटांनी उघडले | पुढारी

औरंगाबाद : पावसामुळे नाथसागर धरणाचे १८ दरवाजे दोन फुटांनी उघडले

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील विविध गावासह नाथसागर धरणाच्यावरील भागात सलग दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाउस सुरू आहे. नाथसागर धरणातून गोदावरी नदीत आज (शुक्रवार) सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान १८ दरवाजे दोन फूट उघडून विसर्ग वाढविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या धरण नियंत्रण अधिकाऱ्यांनी घेतला. तालुक्यात आत्तापर्यंत ५८५८ मिमी पाऊस पडल्याची महसूल विभागात नोंद करण्यात आली. दरम्यान नाथसागर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे गणपती विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांनी व नागरिकांनी पाण्यात उतरू नये असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहूल यांनी केले आहे.

बुधवारी सायंकाळी व गुरुवारी दिवसभर अधूनमधून नाथसागर धरणाच्या वरील भागासह पैठण तालुक्यातील विविध गावामध्ये कमी अधिक मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. त्‍यामुळे येथील नाथसागर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन ९७ .२५ टक्‍के पाण्याची पातळी झाली. त्‍यामुळे धरणाचे दरवाजे शुक्रवारी रोजी सकाळी नऊ वाजता धरण नियंत्रण शाखा अभियंता विजय काकडे यांनी २७ पैकी १८ दरवाजे दोन फूटाने उघडत, गोदावरी नदीत ३७ हजार ७२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान गुरुवारी सर्वाधिक पाऊस १३ मिमी पैठण मंडळामध्ये झाला. यासह विहामांडवा ५८७, लोहगाव ५४३, पाचोड ६१९, आडुळ ५०४, नांदर ७१२, बालनगर ५९७, ढोरकान ५६४, बिडकीन ६६९, पिंपळवाडी पिं ५६२ असा एकूण ५८५८ मी.मी झाल्याची नोंद महसूल विभागात करण्यात आल्याची माहिती दैनिक पुढारीशी बोलताना तहसीलदार शंकर लाड यांनी दिली आहे.

हेही वाचा :  

Back to top button