राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा; महाराष्ट्रात चार जिल्ह्यातून होणार प्रवास | पुढारी

राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा; महाराष्ट्रात चार जिल्ह्यातून होणार प्रवास

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : देशात महागाई, बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली आहे. न्याय व्यवस्थेवरही शंका उपस्थित केली जात आहे. पण यावर पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. या कारणास्तव जनतेला न्याय देण्यासाठी जनतेच्या दरबारात जावून काँग्रेसचे खासदार राहूल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातून या यात्रेचा चार दिवस प्रवास होईल अशी माहिती माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी हिंगोलीत बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

खा. राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्त येथील शासकीय विश्रामगृहात 7 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक, सरचिटणीस श्याम उमाळकर, अमर खानापुरे, आ. प्रज्ञाताई सातव, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी करडिले आदींची उपस्थिती होती.

यावेळी पत्रकार परिषदेत पुढे बोलताना माणिकराव ठाकरे म्हणाले की, काँग्रेस नेते खा. राहूल गांधी यांनी काढलेली ऐतिहासिक भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातून जाणार आहे. 7 सप्टेंबर रोजी ही यात्रा कन्याकुमारी येथून निघाली आहे. हिंगोली जिल्हृयातून 80 ते 85 किमी असा चार दिवसाचा प्रवास या यात्रेत असणार आहे. या यात्रेसाठी तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी जावून जनजागृती केली जाईल. या देशात महागाई वाढली आहे. संसदीय प्रणालीमध्ये बेरोजगारीवर बोलले पाहिजे पण कोणी बोलत नाही. न्याय व्यवस्थेवर लोकांना संशय येत आहे. लोकशाही प्रणाली संपवण्याचा डाव केंद्र सरकारने आखला असून संविधान विरोधी कार्यक्रम राबविले जात आहेत. हे लोकांना मान्य नाही. म्हणून जनआंदोलन तयार व्हावे या हेतुने ही यात्रा काढण्यात येणार आहे. राहूल गांधी यांच्या या ऐतिहासिक यात्रेमध्ये लाखो लोक सहभागी होतील असा विश्वासही माजी मंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड यामार्गे यात्रा महाराष्ट्रातून जाणार आहे अशी माहिती माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्येच…

अशोकराव चव्हाण हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले आहे. दिल्ली येथे झालेल्या सभेत केवळ दहा लोकांना बोलण्याची संधी होती. त्यात अशोकराव चव्हाण यांचेही नाव होते. ते पक्ष बदलाचा विचार करू शकत नाहीत. विरोधकांकडून चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमध्ये राहणार आहेत असे उत्तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर माजी मंत्री ठाकरे यांनी दिले आहे.

हेही वाचा

Back to top button