

पुणतांबा, पुढारी वृत्तसेवा: पुणतांबा परिसरात बिबट्याच्या संख्येत वाढ झाली असून दोन ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. वनविभागाने तत्परतेने दखल घेऊन पिंजरा लावावा, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांच्यासह नागरिकांनी केली आहे. रस्तापूर, शिंगवे भागात दहा बारा दिवसांपूर्वी नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. याठिकाणी अनेक पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला असल्याचे सांगितले. एका वस्तीवरील सीसीटीव्ही फुटेच मध्येही बिबट्या फिरताना कैद झालेला दिसत आहे. यानंतर याठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे.
सोमवारी श्रीरामपूर रस्त्यावरील गणपती मंदिर परिसरात असलेल्या वस्तीवरील नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. कुत्रा पकडून उसात नेल्याचे प्रत्यक्षदरशिनी सांगितले. याभागात तीन चार महिन्यांपूर्वी बिबट्या दिसला होता. गावाच्या पुर्व पश्चिम भागात बिबट्या असून यांची संख्या जास्त असल्याची शक्यता व्यक्त केली जात, नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील शालेय विद्यार्थी दूध उत्पादक शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिक गावात येत असतात. यामुळे जिवीतास थोका निर्माण होऊ शकतो, वनविभागाने तातडीने दखल घेऊन येथेही पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी कुलकर्णी यांच्यासह गणेश कारखान्याचे संचालक राजेंद्र थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश कुलकर्णी, बाबासाहेब खोसे, बाळासाहेब भांडारे, धनंजय कुलकर्णी, भिकाजी वांढेकर यांनी केली आहे.
दरम्यान, वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली असून नागरिकांनी जागृत राहून काळजी घ्यावी, तसेच रात्री बाहेर पडताना गळ्यात मफलर, मोठे उपरणे याचा वापर करावा, तसेच एकट्याने बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. या बिबट्याने आत्तापर्यंत अनेक पाळीव जनावरांचा फडशा पाडलेला आहे. त्यामुळे शेतकर्यांना आपली जनावरांचे राखण करण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. पशुधनाचे नुकसान होत असल्याने शेतकर्यांचा याचा मोठा फटका बसत आहे.