

अप्पासाहेब खर्डेकर; जालना : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत तसेच ऑनलाइन पद्धतीने 1 ऑगस्टपासून आधार जोडणीचे कामकाज सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे तीन लाख 91 हजार 247 मतदारांची मतदार यादीतील तपशीलाशी आधार जोडणी पूर्ण झाली आहे. यात घनसावंगी विधानसभेत सर्वाधिक आधारलिंक झाले असून जालना सर्वात कमी आहे.
आधार जोडणी करण्यात प्रामुख्याने घनसांवगी, भोकरदन, बदनापूर या ग्रामीण भागातील मतदारांनी शहरी मतदारापेक्षा चांगला प्रतिसाद दिला आहे. जालना विधानसभा मतदार संघात आधार जोडणीस प्रतिसाद कमी मिळत असल्याचे दिसून येत असून 58 हजार 888 मतदारांनी आधार जोडणी केली आहे. सर्वाधिक आधार जोडणीचे काम घनसावंगी विधानसभा मतदार संघात झाले आहे. घनसावंगीत तब्बल 95 हजार 981 मतदारांनी आधार जोडणी करून घेतली आहे. मतदारांना त्यांचा आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशीलाशी जोडण्यासाठी अर्ज क्रमांक '6 ब' भरावा लागेल. हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या संकेतस्थळ, वोटर पोर्टल
किंवा वोटर हेल्पलाइन अॅपद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांना मोबाईलमध्ये स्थापित करून आधार जोडणी करता येईल.
एखाद्या मतदाराकडे आधार कार्ड नसल्यास अर्ज क्रमांक 6 ब मध्ये दर्शविलेल्या 11 पर्यायी कागदपत्रांपैकी एक कागदपत्र सादर करता येईल. यात मनरेगा जॉब कार्ड, फोटो असलेले बँकेचे किंवा पोस्ट ऑफिसचे पासबुक, आरोग्य स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, पासपोर्ट यासह इतर ओळखपत्राचा यांत समावेश आहे.
मतदान कार्ड आधार कार्डाच्या क्रमांकाशी जोडणी करणे मतदारांना ऐच्छिक आहे. मतदारांनी केवळ आधार कार्ड सादर करण्यास
असमर्थतेमुळे मतदार यादीतून मतदारांच्या नावाची वगळणी केली जाऊ शकत नाही याची माहिती ग्रामसभेत मतदारांना/नागरिकांना
द्यावी. प्रत्येक मतदारांकडून आधार क्रमांक विहित स्वरुपात व विहितरीतीने मिळविण्यासाठी वैधानिकरीत्या मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
विधानसभा एकूण मतदार जोडणी झालेले मतदार
परतूर 299242 72581
घनसावंगी 307855 95981
जालना 306780 58888
बदनापूर 310852 79539
भोकरदन 303695 84258