औरंगाबाद जिल्ह्यात टीबीच्या रुग्णांत वाढ | पुढारी

औरंगाबाद जिल्ह्यात टीबीच्या रुग्णांत वाढ

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात टीबीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बऱ्याचदा लक्षणे दिसत असतानाही रुग्ण व नातेवाइकांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा आजार फैलावत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे 13 ते 30 सप्टेंबर दरम्यान क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 5) जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेत ग्रामीण भागातील सर्व लोकसंख्या आणि शहरी भागातील 30 टक्के लोकसंख्या अशा एकूण 29 लाख 41 हजार नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी करण्यासाठी 2250 पथके स्थापन करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पथकातील कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करतील. या पथकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 450 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. या पथकांना तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून आपण हा कार्यक्रम राबवत आहोत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे दिसत आहे. हे आजार उपचाराने बरे होणारे आहेत. प्राथमिक स्तरावर असतानाच रुग्ण निश्चित झाल्यास उपचार करणे व प्रादुर्भाव रोखणे सोपे जाते. टीबी आजाराच्या रुग्णांनी वेळेवर उपचार न घेतल्यास, त्यांच्या संपर्कातील 15 जणांना त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे रुग्ण लवकर शोधून, उपचार करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. 2025 पर्यंत टीबी निर्मूलनाचे ध्येय आहे.
-डॉ. अभय धानोरकर, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.

Back to top button