औरंगाबाद : वीज कट करण्याचा फेक मेसेज पाठविणार्‍यास ‘शॉक’ | पुढारी

औरंगाबाद : वीज कट करण्याचा फेक मेसेज पाठविणार्‍यास ‘शॉक’

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : ‘बिल न भरल्यामुळे वीज कट होणार,’ असा फेक मेसेज पाठवून सेवानिवृत्त महिलेचे दोन लाख पाच हजार रुपये ऑनलाइन लंपास करणार्‍या भामट्याला सायबर पोलिसांनी चांगलाच ’शॉक’ दिला. भामट्याने लंपास केलेल्या दोन लाख पाच हजार रुपयांपैकी पोलिसांनी एक लाख 95 हजार रुपये परत मिळवून दिले. फसवणूक होताच सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे त्यांना हे पैसे परत मिळवून देता आले, हे विशेष. ’बँक हॉली डे’ असताना सायबर पोलिसांनी ही कामगिरी केली.

सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांनी सांगितले, की पुष्पा मगर या 31 ऑगस्ट रोजी कोषागार विभागातून सेवानिवृत्त झाल्या आहेत. तत्पूर्वी एक दिवस आधी त्यांच्या बँक खात्यात सेवानिवृत्तीची रक्कम आली होती. दरम्यान, त्याच वेळी त्यांना सायबर भामट्याने ‘महावितरणचे वीज बिल न भरल्यामुळे आज रात्री तुमचे वीज कनेक्शन कट केले जाईल,’ असा फेक मेसेज पाठविला. सोबत एक मोबाइल क्रमांकही दिला होता. मगर यांना भामट्यांची ही चाल लक्षात आली नाही. त्यांनी मेसेजमधील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.

‘क्विक सपोर्ट’ने लांबविली रक्कम

पुष्पा मगर यांनी मेसेजमधील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर भामट्याने त्यांना ‘वीज बिल भरण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल,’ असे सांगून क्विक सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर मगर यांच्या बँक खात्यातून परस्पर दोन लाख पाच हजार रुपये गायब केले. दरम्यान, मगर यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर ठाण्यात धाव घेऊन निरीक्षक गौतम पातारे यांची भेट घेतली. त्यांना सर्व हकिगत सांगितली. त्यावर पातारे, सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, अंमलदार श्याम गायकवाड यांनी तांत्रिक तपास करून त्यांच्या खात्यातील रक्कम ज्या खात्यात वळती झाली, त्या बँकेशी पत्रव्यवहार करून त्यांनी एक लाख 95 हजार रुपये परत मिळविले. ही रक्कम पुष्पा मगर यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.

Back to top button