

विष्णू आचार्य; पानगाव : उशिराने झालेली पेरणी, उगवलेल्या अर्धे अधिकाची गोगलगायींनी फस्त करून लावलेली वाट व त्यातही
कसेबसे तग धरलेलेल्या पिकांनी पावसाने ओढ दिल्याने टाकलेल्या माना. यामुळे धास्तावलेल्या बळीराजाच्या मनात सुरू असलेली घालमेल अखेर रविवारी रात्री वरुणराजाच्या मनसोक्त बरसातीने दूर केली. धोधो बरसलेल्या या सरीला पैशांचा पाऊस असे म्हणत गावकर्यांनी या चैतन्य धारांचे स्वागत केले.
दरवर्षी मृगात होणारा पाऊस यावर्षी काहीसा उशीराने बरसला. त्यामुळे उशिराच पेरणी झाली. पेरलेल्या धान्याला कोंब फुटू लागताच गोगलगायींनी हल्ला करून अनेकांचे अर्धे अधिक सोयाबीन फस्त करून टाकले. वरुणराजाने पंधरा दिवस रोजच टिप टिप सुरू ठेवल्यानं वावरांत पिकापेक्षा अधिक 'तण'च डोलू लागले. त्यामुळे कोळपणी, खुरपणी अन फवारणीतच बळीराजा बेजार होऊ लागला. कसेबसे शेत ठिकाण्यावर येत असतानाच आठदहा दिवस ढगाळ वातावरणामुळे पान अळी-खोड अळीने डाव साधला व पिकांच्या माना मुरगाळू लागल्या त्यावर उपाय म्हणून बळीराजाने फवारा पाठीवर घेऊन जेवढे आहे. तेवढे तरी किमान पदरात पडावे म्हणून कसरत सुरू ठेवली.
उभे आहे त्याला फुले व शेंगा धरू लागताच पानगाव परिसरात वक्रदृष्टी करीत वरुणराजाने डोळे वटारले. रोज दिवसभर उन्हाचा पारा वाढत राहिला फुले आणि धरलेली शेंग कोमेजू लागली. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी पाणी देऊन पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू केला तर ज्यांच्याकडे पाणी नाही, ते मात्र हतबल झाले तथापि रविवारी पानगाव परिसरात वरुणराजाने जोरदार बॅटिंग केली अन् आणि बळीराजाला अवश्यक आहे तेवढा धो-धो बरसला पैशाचा पाऊस म्हणून पानगावकरांनी त्याचे स्वागत केले. अशीच कृपादृष्टी असू दे अशी कामनाही त्याच्याकडे केली
संग्राम वाघमारे; चाकूर : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने महिनाभर दडी मारल्याने तालुक्यात पुनरागमन केल्याने शेतकर्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून आला आहे. त्यामुळे शेतकर्याच्या चेहर्यावर आनंद दिसून आला तर सोयाबीन पिकांना
नवसंजीवनी मिळाली आहे. रविवारी रात्री व सोमवारी दुपारी तालुक्यातील बहुतांश ठिकाणी व गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. विशेषतः चापोली, वडवळ, नळेगाव आणि चाकूर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्याच्या काही भागांत विजेच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने काही ठिकाणी विजेचा तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला तर तहसील कार्यालयाच्या परिसरात झाड
उन्मळून पडले आहे.
विजय देशमुख; निटूर : तब्बल एक महिन्याच्या विश्रांतीनंतर निलंगा तालुक्यात रविवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामध्ये तालुक्यातील निलंगा , मदनसुरी, भूतमुगळी या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे पाण्याअभावी करपलेल्या पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे.
निलंगा तालुक्यात यावर्षी काही ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे काही भागांत पेरण्या मृग व आद्रा नक्षत्रात झाल्या तसेच
उर्वरित भागामध्ये पेरणी योग्य पाऊस झाला नसल्यामुळे त्या ठिकाणी पेरण्याही उशिरा झाल्या. त्यामुळे उशिरा पेरून उगवलेले
अनेक शेतकर्यांचे सोयाबीनचे पीक गोगलगायींनी फस्त केले. या संकटातून ही सोयाबीनचे पीक काही ठिकाणी चांगले असताना व ते ऐन फुलोर्यात असताना गेल्या महिन्याभरापासून पावसाने उघडीप दिल्याने आहे ते पिकेही करपून गेले होते. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान रविवारी संध्याकाळी पाऊस पडल्यामुळे काही प्रमाणात करपलेल्या पिकांना जीवदान मिळणार
आहे. मात्र हाच पाऊस पंधरा दिवसांपूर्वी पडला असता तर उत्पादनात वाढ झाली असती, असे शेतकरी बोलत आहेत.
रविवारी रात्री पडलेला पाऊस निलंगा मंडळामध्ये सर्वाधिक पडला. निलंगा मंडळात 99 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे तर त्या नंतर भूतमुगळी व मदनसुरी मंडळांमध्ये 73 मि. मी. पावसाची नोंद झाली. निटूर 41.5 मि. मी., पानचिंचोली 43.8 मि. मी., औरादशहा 2 .3 मि. मी, कासार बालकुंदा 35 मि. मी, अंबुलगा 27 मि.मी., कासार सिरसी 30. 3 मिमी तर हलगरा 2. 3 मि. मी पावसाची नोंद झाली
आहे .काल पडलेल्या पावसामध्ये सर्वात कमी पावसाची नोंद औराद शहा व हलगरा या मंडळामध्ये झाली आहे.