लातूर : ग्रामीण बँक फोडली | पुढारी

लातूर : ग्रामीण बँक फोडली

शिरूर अनंतपाळ; पुढारी वृत्तसेवा :  लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ शहरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेचे कार्यालय फोडून रोख रकमेसह लॉकरमधील सोने असा 58 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी निकेतन कदम यांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली. त्यानंतर पाचारण करण्यात आलेल्या श्‍वानपथकाने दूरपर्यंत दरोडेखोरांचा माग काढला. परंतु त्यांचे धागेदारे लागले नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ग्रामीण बँकेची शाखा शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या वरच्या मजल्यावर आहे. सध्या नगरपंचायत इमारतीचे दुरुस्तीचे काम चालू आहे. त्यामुळे तळमजला दुरुस्तीसाठी पाडण्यात आलेला आहे. त्यात रविवारी बँकेला सुटी होती. सुटी आणि बांधकाम दुरुस्तीबाबत संधी साधून चोरट्यांनी या बँकेच्या शाखेचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि तिजोरीतील रोख रक्‍कम, सोने लुटून पोबारा केला. सोमवारी ही घटना लक्षात येताच नागरिकांनी पोलिसांना माहिती कळविली. पोलिस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर श्‍वान पथकालाला पाचारण करण्यात आले. याप्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक सौरभ खैरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात अज्ञात दरोडखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत काय, त्यात चोरीचे चित्रीकरण झाले का, याचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेने शहरात दहशत निर्माण झाली आहे. चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्‍त केली.

चोरट्यांनी बँकेतील रोख 27 लाख रुपये व लॉकरमध्ये ठेवलेले 31 लाख 94 हजार रुपयांचे सोने असा एकूण 58 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, सोमवारी सकाळी कर्मचारी बँकेत आले असता त्यांना बँकेत चोरी झाल्याचे निदर्शनास आले

Back to top button