लातूर : पानगावात ढगफुटीसारखा पाऊस | पुढारी

लातूर : पानगावात ढगफुटीसारखा पाऊस

पानगाव, पुढारी वृत्तसेवा : रविवारी रात्री आणि सोमवारी (दि.5 ) पुन्हा दुपारी अडीच वाजेपासून साडेचार वाजेपर्यंत झालेल्या धुवाधार पावसामुळे रेणापूर तालुक्यातील पानगावात एकच हाहाकार उडाला. या गावात ढगफुटीसारखा पाऊस पडल्याचे वृत्‍त आहे. या पावसामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी घुसल्याने घरात बसविलेल्या गौरी गणपतीच्या मूर्ती पाण्याने भिजल्या. साहित्यही पाण्यात भिजले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

महिनाभराच्या विश्रांतीनंतर रविवारी सोमवारी जोरात पाऊस बरसला. या दोन तासांच्या पावसाने पानगाव शहर व परिसरात पाणीच पाणी करून टाकले. रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहत होते तर संभाजी चौकातील रस्त्यावरील पाणी या परिसरात राहणार्‍या शिवाजी सूर्यवंशी, महादु सूर्यवंशी, उत्तम सूर्यवंशी, प्रल्हाद सूर्यवंशी ,रामदास फुले , गिरी फुले , काशीनाथ कस्पटे आदींच्या घरात गुडघ्याइतके साचले होते. घरात पाणी शिरल्याने घरात बसविलेले गणपती व गौरी लक्ष्मीच्या मूर्ती पाण्यात भिजल्या. त्यानंतर कसे बसे त्यांना स्टूलवर , टेबलवर ,पलंगावर उभे करण्यात आले. घरातील दैनंदिनी लागणार्‍या जीवनावश्यक वस्तुंचे अचानक आलेल्या पाण्याने मोठे नुकसान झाले असून
त्यांना तातडीची मदतीची गरज आहे. पोलिस चौकीला चोहूबाजूने पाण्याचा वेढा आल्याने चौकीस तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले केबलच्या
खड्ड्यात वाहने फसून बसले तर अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली

औसा तालुक्यात अनेक ठिकाणी वाहतूक सेवा बंद

औसा, पुढारी वृत्तसेवा: रविवारी रात्री औसा तालुक्यातील विविध भागात जोरदार पाऊस झाल्याचे वृत्‍त आहे. या पावसामुळे किल्लारीसह परिसरातील भागातील अनेक घरात पाणी शिरले. स्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सोमवारी दुपारपर्यंत अनेक भागांतील वाहतूक बंद झाली होती. रविवारी रात्री औसा तालुक्यातील किल्लारी व परिसरातील बानेगाव, तळणी, हारेगाव भागात मुसळधार
पाऊस झाल्याने किल्लारीवाडी येथील रस्त्यावरचे पाणी वेंकट रुद्राप्पा बिराजदार, नीळकंठ महादेवराव बिराजदार, राजेंद्र विलास बिराजदार, धनराज मादप्पा बिराजदार इत्यादींसह 10 ते 15 लोकांच्या घरात शिरल्याने अनेक घरातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. तर औसा -सास्तूर मार्गावरील नागरसोगा तसेच जवळगा पो-हारेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील
वाहतूक दुपारी 1 वाजेपर्यंत ठप्प होती.

किल्लारी, जवळगा पो, हारेगाव, लिंबाळा या भागातील अनेक शेतातील बांध फुटून शेतीचे नुकसान झाले आहे. तर अचानक झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अगोदर संततधार पाऊस, गोगलगाय त्यानंतर यलो मोझॅक या रोगाचा मारा झाल्याने अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आला होता. त्यातच मागच्या 15 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्ग धास्तावला होता. त्यातच गेल्या 4 दिवसांपासून दररोज रात्री पाऊस हजेरी लावत आहे. पण अचानक ढगफुटीसदृश पावसाने खरीप हंगामात पिके हातची जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Back to top button