औरंगाबाद : सधन कुटुंबांचे रेशन कार्ड होणार रद्द | पुढारी

औरंगाबाद : सधन कुटुंबांचे रेशन कार्ड होणार रद्द

औरंगाबाद; अमित मोरे : बंगले आणि चारचाकी वाहन असलेल्या सधन कुटुंबीयांकडेही पिवळे, केशरी रेशन कार्ड आहे. शिवाय ते नियमितपणे धान्याचा लाभही घेत आहेत. त्यामुळे सध्या अनेक पात्र लाभार्थी योजनेच्या धान्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडून या सधन कुटुंबीयांना लाभाचे रेशनकार्ड रद्द करून पांढरे रेशन कार्ड दिले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक रेशन दुकानातून अशा कुटुंबीयांचे अर्ज भरणा करून घेण्यात येत आहेत.

जिल्ह्यात 7 लाख 32 हजार 245 रेशन कार्डधारक आहेत. यांत धान्याचा लाभ हा केवळ 4 लाख 75 हजार 424 रेशन कार्डधारकांना मिळतो. त्यातही हजारो रेशन कार्डधारक हे सधन असून, शासनाच्या नियमानुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न हे लाखोंच्या घरात आहे, परंतु, असे असतानाही अनेकजण आजही रेशन धान्याचा लाभ घेत आहेत. या तांदूळ व गव्हाची ते नियमितपणे उचल करत आहेत, परंतु काहीजण या धान्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कोरोना महामारीत अनेकांना रेशनच्या धान्याचे महत्त्व कळाले आहे.

लॉकडाउनमुक्त जिल्हा होताच अनेकांनी रेशन कार्ड काढण्यास सुरुवात केली, परंतु जिल्ह्याला वाढीव धान्य कोटा मिळत नसल्याने या नव्या रेशन कार्डधारकांपैकी जे खरेच योजनेच्या धान्यासाठी पात्र आहेत, त्या अनेकांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने वाढीव कोट्याची मागणीदेखील शासनाला केली आहे. परंतु, अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान, केंद्राने ज्याप्रकारे गॅस सिलिंडरवरील सबसिडी सधन कुटुंबीयांनी स्वत:हून परत करावी, असे आवाहन केले होते. तसेच आवाहन आता रेशन कार्डधारक सधन कुटुंबीयांना केले आहे. या कुटुंबाने स्वत:हून रेशनचा लाभ परत करावा. तसेच पांढरे रेशन कार्ड घ्यावे, असे आवाहन केले आहे.

रेशन दुकानदार घेतायत शोध

शासनाने सध्या आवाहन केले आहे. त्यासोबतच रेशन दुकानदारांना सधन कुटुंबीयांकडून सक्तीने लाभ परत करण्याचे अर्ज भरून घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून रेशन दुकानदार ही मोहीम राबवत आहेत, परंतु ई-पॉज मशिनच्या घोळामुळे रेशन धान्यवाटप प्रक्रिया रखडल्याने गेल्या महिन्यात मोहीम सुरू होण्यास विलंब झाला. या महिन्यात धडक मोहीम राबवण्यात येणार असल्याचे काही रेशन दुकानदारांनी सांगितले.

मोहीम सधन कुटुंबीयांसाठी

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवरील सबसिडी सधन कुटुंबीयांनी परत करावी, यासाठी जसे आवाहन केले होते, अगदी तशीच मोहीम रेशनच्या विविध योजनांचा लाभ घेणार्‍या सधन कुटुंबीयांविरोधात सुरू केली आहे. त्यांनादेखील लाभ परत करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. रेशन कार्डशी आधार लिंक असल्याने ही माहिती प्रशासनाला त्वरित उपलब्ध होऊ शकते, परंतु नागरिकांनी स्वत:हून सहकार्य करावे, यासाठी ही मोहीम आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिली.

Back to top button