औरंगाबाद : पोलिस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : पोलिस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शेजारील महिलेसह तिचे कुटुंबीय, पती त्रास देतात आणि वाळूज पोलिस त्यांना पाठीशी घालतात, असा आरोप करीत पोलिस आयुक्तालयाच्या दारात अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतलेल्या सविता दीपक काळे (34, रा. मांडवा, ता. गंगापूर) या महिलेचा शुक्रवारी (दि. 2) पहाटे 4 वाजता अखेर मृत्यू झाला. अवघ्या चौदा तासांतच त्यांची मृत्यूशी झुंज थांबली. धक्कादायक म्हणजे, मृत्युपूर्व जबाबात त्यांनी पोलिस, पती, शेजारील महिला, तिचा मुलगा आणि तिचा पती या पाच जणांवर आरोप केले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सविताचा 2002 साली दीपक काळे याच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. एक मुलगी विवाहित आहे. दरम्यान, दीपक हा खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करतो. सविता त्याच्यावर नेहमी संशय घ्यायची. त्यातून त्यांच्यात वाद व्हायचे. तसेच, शेजारील महिला संगीता अशोक शेळके, तिचा मुलगा गोकूळ अशोक शेळके आणि पती अशोक शेळके हेदेखील या ना त्या कारणावरून सविताला शिवीगाळ, मारहाण करायचे. शेळके कुटुंबीयांना सविताचा पती दीपक साथ द्यायचा. या एकूण प्रकरणाला कंटाळून सविता व तिचा भाऊ श्यामसुंदर विश्वनाथ काकडे (36, रा. लांझी, ता गंगापूर) यांनी 27 मे, 3 जून, 24 ऑगस्ट व 30 ऑगस्ट अशी चारवेळा वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार केलेली आहे. त्यावरून कधी मारहाणीचा गुन्हा दाखल केला तर कधी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केलेली आहे. पोलिसांनी शेळके कुटुंबीयांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. मात्र, त्यातून यांचा वाद संपला नाही. उलट त्यांच्या वादाला हवा मिळत गेली. शेळके कुटुंबीय अधिक त्रास द्यायला लागले होते. त्यांना दीपक काळेची साथ असायची.

मुलाने दिला अग्निडागशुक्रवारी पहाटे चार वाजता सविताचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. घाटीतील डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. दरम्यान, सकाळ 10.30 वाजता सविताचा मृतदेह तिच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केला. त्यानंतर मांडवा येथे सविता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 11 वर्षीय मुलाने अग्निडाग दिला. तर, माहेर व सासरकडील मंडळींनी अंत्यसंस्कार पार पाडले. पती दीपक काळेला गुरुवारपासून पोलिसांनी ठाण्यात बोलावून घेतलेले आहे. तो अंत्यविधीलाही जाऊ शकला नाही. पोलिसासह 5 जणांवर गुन्हा; तिघे अटकेत सवितावर अंत्यसंस्कार केल्यावर भाऊ श्यामसुंदर काकडे हे शुक्रवारी संध्याकाळी बेगमपुरा ठाण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरून सविताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संगीता अशोक शेळके, अशोक तुकाराम शेळके, गोकूळ अशोक शेळके, दीपक मनोहर काळे आणि सहायक फौजदार गायके आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी अशोक, गोकूळ आणि दीपक या तिघांना अटक करण्यात आली.

Back to top button