औरंगाबाद : चंद्रकांत खैरेंचा आधी सत्कार केल्याने आमदार संजय शिरसाट संतापले | पुढारी

औरंगाबाद : चंद्रकांत खैरेंचा आधी सत्कार केल्याने आमदार संजय शिरसाट संतापले

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीने संत एकनाथ रंगमंदिरात शनिवारी (दि. 27) सार्वजनिक गणेशोत्सवाची समन्वय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा सत्कार आमदार संजय शिरसाट यांच्या आगोदर केल्याने ते संतप्त झाले व व्यासपीठ सोडून जाण्यासाठी उठले. तेवढ्यात बाजूलाच बसलेल्या खासदार इम्तियाज जलील यांनी मध्यस्थी करत त्यांना शांत करत जाण्यापासून रोखले. या घटनेमुळे काही काळ मानापमान नाट्य चांगलेच रंगले होते.

गणोशोत्सव शांततेत पार पाडावा, यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीने समन्वय बैठक शनिवारी(दि. 27) संत एकनाथ रंगमंदिरात बोलावण्यात आली होती. सायंकाळी 6.30 च्या सुमारास सुरू झालेल्या बैठकीत केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, पृथ्वीराज पवार, विजय औताडे, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा आयुक्त अभिजित चौधरी आदी व्यासपीठावर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अर्थमंत्री डॉ. कराड, मंत्री अतुल सावे, खा. इम्तियाज जलील, त्यानंतर माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा सत्कार पोलिस आयुक्तालयांच्या वतीने करताच आमदार संजय शिरसाट संतप्त झाले व प्रोटोकॉल आहे की नाही, म्हणत ते व्यासपीठावरून उठले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खा. जलील यांनी त्यांना शांत करत, हात धरून व्यासपीठावर बसवले. या मानापमान नाट्यामुळे काही काळ रंगमंदिरात शांतता पसरली होती.

पदाधिकार्‍यांची भाषणबाजी समन्वय समितीच्या बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांकडून सूचना मागवण्यासाठी बैठक आयोजित केली होती, परंतु येथे काही उत्साहित पदाधिकारी मात्र व्यासपीठावरील मंत्रिमहोदयांसह आमदार, खासदारांवर स्तुतिसुमने उधळण्याचे काम करत होते. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

Back to top button