जालना : कर्जबाजारीपणातून शेतकरी दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

जालना : कर्जबाजारीपणातून शेतकरी दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

सुखापुरी; पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथील दाम्पत्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (दि. २७) सकाळी ७ च्या सुमारास उघडकीस आली. खासगी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्याच्या कारणातून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असल्याचे नातेवाईकांकडून सांगितले जात आहे.

मिळालेली माहिती अशी की, अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथील संजय भाऊराव ढेबे (वय ४५) व त्यांची पत्नी संगीता संजय ढेबे ( वय ४०) यांनी वेगवेगळ्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. तसेच यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाचे पीक देखील धोक्यात आले आहे. तसेच फायनान्स कंपनीच्या वारंवार होत असलेल्या हप्ते भरण्याच्या तगाद्याने ढेबे दाम्पत्य नैराश्यात होते.

दरम्यान, आज सकाळी घराशेजारील सिंधुबाई शामराव ढेबे यांना या दोघांना गळफास घेतलेल्या अवस्थेत बघितले. याबाबत त्यांनी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील राजेंद्र गाडेकर यांनी गोंदी पोलीस ठाण्याला कळविले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याचे बीट जमादार मदन गायकवाड यांनी सांगितले. सुखापुरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. या दाम्पत्याला मुलगा, मुलगी आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून दाम्पत्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button