उस्मानाबादला महिलेची स्वच्छतागृहात प्रसूती; जिल्हा महिला रुग्णालयातील प्रकार | पुढारी

उस्मानाबादला महिलेची स्वच्छतागृहात प्रसूती; जिल्हा महिला रुग्णालयातील प्रकार

उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा : मर्यादित 60 बेडच्या तुलनेत दररोज रुग्णांची संख्या मोठी असल्याने जिल्हा महिला रुग्णालयावरील ताण वाढत चालला आहे. परिणामी बुधवारी (दि. 24) एका महिलेची प्रसुती स्वच्छतागृहात झाली. त्यामुळे आता तरी सरकार या रुग्णालयाच्या वाढीव बेडसाठी तातडीने जागा उपलब्ध करुन देईल, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यातच आरोग्य व्यवस्थेची अवकळा समोर आली आहे. जिल्हा महिला रुग्णालयाची बेड संख्या अवघी 60 इतकी आहे. तर दररोज साधारण 30 प्रसुती येथे होतात. नवीन रुग्णांची दररोज 50 ते 60 इतकी नोंद होते. यात शेजारच्या सोलापूर व नगर जिल्ह्यातील रुग्णांचेही प्रवेश होत असतात. बुधवारी नारीवाडी येथील रुक्मिणी सुतार यांना वेदना होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. या वेळी बेड उपलब्ध नसल्याने त्या रुग्ण कक्षासमोरील व्हरांड्यात चकरा मारत होत्या. काही वेळात त्या स्वच्छतागृहात गेल्या असता तिथेची प्रसुती झाली. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयाला मंजूर असलेल्या 100 बेडसाठी तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याबरोबरच रिक्त कर्मचार्यांची पदेही भरण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Back to top button