औरंगाबाद : ट्रक चालकानेच लांबविली वीस लाखांची ‘व्हिस्की’ | पुढारी

औरंगाबाद : ट्रक चालकानेच लांबविली वीस लाखांची ‘व्हिस्की’

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : नाशिकच्या कंपनीतून आणलेले व्हिस्कीचे 400 बॉक्स ट्रक चालकाने परस्पर लंपास केले. हा प्रकार सोमवारी रात्री समोर आल्यावर जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच खबऱ्यांना कामाला लावून मंगळवारी ट्रक आणि दारू, असा 33 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी ट्रकचालकाचे नाव इम्रान शेख असे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी (जि. नाशिक) एमआयडीसीतील युनायटेड स्पिरिट कंपनीतून विदेशी दारूचे 400 बॉक्स औरंगाबादेतील करोडी येथील रिचमॅन कंपनीच्या गोदामापर्यंत आणण्याचे काम वाळूज येथील ट्रान्स्पोर्ट कंपनीला मिळाले होते. त्यानुसार, चालक इम्रान ट्रक घेऊन गेला. दिंडोरी येथील कंपनीतून विदेशी दारूचे 400 बॉक्स भरले. 20 ऑगस्ट रोजी तो ट्रक घेऊन औरंगाबादला निघाला. 22 ऑगस्टपर्यंत तो करोडीत पोहोचणे अपेक्षित होते, परंतु तो तेथे आला नव्हता. ट्रान्स्पोर्टचे व्यवस्थापक मनोजकुमार यांना संशय आल्यामुळे त्यांनी इम्रानला संपर्क साधला असता त्याचा मोबाइल बंद होता. त्यांनी ट्रक मालकाकडे चौकशी केली. त्यांनाही इम्रानबद्दल माहिती नसल्याचे समजले. ट्रान्सपोर्ट कंपनीने जीपीएसच्या आधारे माहिती घेतली असता ट्रक जालना रोडवरील सेव्हन हिलजवळ उभा असल्याचे समजले. त्यांनी जवाहरनगर पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी शोध घेतला असता ट्रक सापडला, मात्र त्यातील दारूसाठा गायब असल्याचे स्पष्ट झाले.

आरोपी झाले पसार

तब्बल 20 लाखांचा विदेशी दारूचा साठा लंपास झाल्याचे प्रकरण समजल्यावर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अजित दगडखैर यांनी तपास सुरू केला. दगडखैर यांना खबर्‍याकडून दारूसाठ्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकासह तत्काळ छापा मारला, मात्र आरोपी तेथून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी साठा तेवढा जप्त केला.

Back to top button