जालना : टीईटी घोटाळ्यात अपात्र 23 शिक्षकांचे पगार रोखले; शिक्षण संचालकांच्या आदेशाने खळबळ | पुढारी

जालना : टीईटी घोटाळ्यात अपात्र 23 शिक्षकांचे पगार रोखले; शिक्षण संचालकांच्या आदेशाने खळबळ

जालना; अप्पासाहेब खर्डेकर : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या जिल्ह्यातील 13 प्राथमिक तर 10 माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा 23 शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठवून त्यांना ऑगस्टपासूनचे वेतन न देण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. या अपात्र शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठविण्याची सूचनाही संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आली आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र असलेल्यांसह शिक्षण सम्राटांचे ही धाबे दणाणले आहे.

टीईटी परीक्षा 2019 मधील 7 हजार 874 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्याने या उमेदवारांना अपात्र ठरवले गेले आहे. या गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या राज्यातील प्राथमिक शाळेच्या 576 आणि माध्यमिक शाळेच्या 447 शिक्षकांचा समावेश आहे. या अपात्र ठरलेल्या शिक्षकांचा ऑगस्टपासून वेतन बंद करण्याचा निर्णय शिक्षण संचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. वेतन बंद करण्याचा निर्णयाबरोबरच या शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठवण्याच्या सूचना संबंधित शिक्षण अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. या अपात्र यादीतील शिक्षक हे महानगर पालिका, नगरपालिका, नगर परिषद, खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिक्षक सेवक किंवा सहशिक्षक पदावर कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. हे शिक्षक अपात्र ठरल्यानंतरसुद्धा शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत होते. त्यामुळे या अपात्र शिक्षकांना ऑगस्टपासून वेतनापासून वगळण्यात यावे, अशा सूचना शिक्षण संचालकांकडे देण्यात आले आहेत. यामुळे बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मागील काही काळात राज्यभरात आरोग्य भरती, पोलिस भरती आणि त्यानंतर टीईटी परीक्षा पेपर फुटीप्रकरण चांगलंच गाजलंय. पुण्यातील सायबर पोलिसांनी आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना, टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी तपास केल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. टीईटी घोटाळ्यासंदर्भात पुणे सायबर पोलिसांकडून ओएमआर सीटची कसून तपासणी केली जात आहे.

वेतन दिल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई

टीईटीतील गैरव्यवहार व त्याअनुषंगाने कार्यवाहीबाबत शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षकांना आदेश पाठवला
आहे. अपात्र उमेदवारांचे शालार्थ आयडी गोठवण्यात आले असून, त्यांना माहे ऑगस्ट 2022 पासून ऑनलाइन अथवा ऑफलाइन वेतन
अदा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांना वेतन अदा झाल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

टीईटीतील गैरव्यवहार व त्या अनुषंगाने कार्यवाहीबाबतची माहिती प्राप्त झाली आहे. अपात्र असलेल्या 23 उमेदवार अर्थात शिक्षकांचे वेतन थांबवण्यात येणार आहे.
-डॉ.कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी

Back to top button