औरंगाबाद : आधार कार्ड काढून घरी परतणारी चिमुकली ठार | पुढारी

औरंगाबाद : आधार कार्ड काढून घरी परतणारी चिमुकली ठार

पैठण, पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांना मिळणार्‍या विविध सवलतींसाठी आधार कार्ड नोंदणी अनिवार्य आहे; मात्र आधार नोंदणीसाठी ग्रामीण भागात व्यवस्था नाही. खेर्डा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीतील चिमुकली सोमवारी (दि. 22) आधार कार्ड नोंदणीसाठी पालकासोबत शहरात आली होती; मात्र गावाकडे परतताना झालेल्या भीषण दुचाकी अपघातात या दहावर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. गायत्री सतीश शिंदे (रा. खेर्डा, ता. पैठण) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. आधार कार्ड नोंदणीसाठी गायत्री सोमवारी पालक सतीश शिंदे यांच्यासोबत पैठण शहरात आली होती.

आधार कार्ड नोंदणी केल्यानंतर ते खेर्डाकडे परत निघाले असता पैठण-पाचोड रस्त्यावरील चारी क्र. 2 जवळ उभ्या असलेल्या टँकरवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात गायत्रीचा मृत्यू झाला, तर सतीश शिंदे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी पोलिस नाईक सुधीर आव्हाळे व मोरे यांना तत्काळ घटनास्थळी पाठविले. त्यांनी जखमींना पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी गायत्रीला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

Back to top button