औरंगाबाद : पत्नीसोबतच्या भांडणातून शिक्षक पतीने शाळेत घेतला गळफास | पुढारी

औरंगाबाद : पत्नीसोबतच्या भांडणातून शिक्षक पतीने शाळेत घेतला गळफास

पाचोड, पुढारी वृत्तसेवा : किरकोळ भांडणातून उद्भभवलेल्या वादाची ठिणगी टोकापर्यंत जाऊन पोहोचली अन् रागाच्या भरात पत्नीने तक्रार करण्यासाठी थेट पोलिस ठाणे गाठले. इकडे घाबरलेल्या शिक्षक पतीने शाळा गाठून वर्गखोलीत गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना कचनेर तांडा नं 6 (ता.जि.औरंगाबाद) येथे शनिवारी ( दि.20) पहाटे घडली.पुंडलिक भागवत जगताप (वय 40, रा.जटवाडा,औरंगाबाद ) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कचनेर तांडा नं 6 येथील धारेश्वर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळेतील शिक्षक पुंडलिक जगताप यांचे पत्नीसोबत काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू आहे. या वादात नातेवाईक नेहमी मध्यस्थी करून दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. शुक्रवारी (दि.19) पुंडलिक जगताप हे आश्रम शाळेतील दिवसभराचे कार्यालयीन कामकाज उरकल्यानंतर नेहमीप्रमाणे जटवाडा येथे घरी गेले. शनिवारी पहाटे दोन वाजता या पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून पुन्हा वाद उफाळला. रागाच्या भरात पत्नी तेवढ्या रात्री घराबाहेर पडली. बेगमपुरा पोलिस ठाण्यात पतीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी ती गेल्याचे समजताच इकडे घाबरलेल्या पुंडलिक जगताप यांनी दुचाकी घेऊन कचनेर तांडा आश्रम शाळा गाठली. निवासी खोलीत नॉयलनच्या दोरीचा फास गळ्याभोवती आवळत आत्महत्या केली.दिवस उजाडल्यानंतर काही विद्यार्थ्यांना हे दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेची माहिती चिकलठाणा पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक देवीदास गात, सहाय्यक फौजदार द्यानेश्वर करंगळे, प्रकाश शिंदे आदींनी चिकलठाणा येथील सामान्य ग्रामीण रुग्णालयात जगताप यांना दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍याने तपासून मृत घोषित केले. या घटनेची चिकलठाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Back to top button