औरंगाबाद : अंकिता श्रीवास्तव खून प्रकरणातील क्रूरकर्मा लाखे ‘स्वामी’; क्रौर्याने हादरले समाजमन | पुढारी

औरंगाबाद : अंकिता श्रीवास्तव खून प्रकरणातील क्रूरकर्मा लाखे ‘स्वामी’; क्रौर्याने हादरले समाजमन

वैजापूर; विजय गायकवाड : लग्नाचा तगादा लावला म्हणून विवाहित प्रेयसीची अत्यंत क्रूरपणे हत्या करणारा तिचा मारेकरी सौरभ लाखे वैतागला होता. काही दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा विचार मनात घोळत होता, परंतु घरातील सदस्यांसह मित्रांनी त्याला समजावून सांगून आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले, मात्र सामाजिक क्षेत्रात वावरणार्‍या लाखेने क्रौर्याची परिसीमा गाठून प्रेयसीची हत्या केल्याने शिऊरसह तालुक्यातील समाजमन हादरले आहे. मारेकर्‍याने त्याच्या आडनावापुढे ’स्वामी’ लावून सामाजिक प्रतिष्ठा वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. शिऊर येथील सौरभ लाखे याने त्याची विवाहित प्रेयसी अंकिता श्रीवास्तव हिचा धारदार शस्त्राने गळा चिरून धड वेगळे करून अत्यंत निर्दयीपणे खून केल्याची घटना 17 ऑगस्ट रोजी औरंगाबादेत उघडकीस आली.

स्वातंत्र्यदिनी ही घटना घडली असली, तरी दोन दिवसांनंतर ही घटना उजेडात आली. यासाठी लाखेच्या मित्रांनीही मदत केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सौरभ लाखे हा गेल्या काही वर्षांपासून मुद्रित माध्यमांसह यूट्यूबसारख्या समाजमाध्यमांसाठी बातमीदार म्हणून काम करीत होता. त्याचे आईवडील शिक्षक होते. वरकरणी स्वभावाने शांत व संयमी वाटणारा सौरभ क्रौर्याची सीमा गाठीत असे कृत्य करील, असे कुणालाही वाटले नव्हते. अंकिता श्रीवास्तव व त्याचे प्रेमप्रकरण गेल्या तीन ते चार वर्षांपासून बहरात होते. त्यामुळे ही गोष्ट त्याच्या मित्रांसह गावातील नागरिकांपासून लपून राहिली नाही. अंकिताने गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मागे लग्नाचा तगादा सुरू केल्याने तो त्रस्त झाला होता. अगोदरच विवाहित असताना दुसरे लग्न कसे करायचे? असा पेच त्याच्यासमोर उभा राहिल्याने काही दिवसांपूर्वी त्याला नैराश्याने ग्रासले होते. यातूनच त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचारही शिवून गेला. हा विचार त्याने मित्रांजवळही बोलून दाखविला, परंतु घरातील सदस्यांसह मित्रांनी त्याला समजावून या अवस्थेतून बाहेर काढून त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.

सौरभ हा नेहमीच समाजमाध्यमांवर अ‍ॅक्टिव्ह असायचा. पोलिस अधिकार्‍यांसोबत छायाचित्र काढून ते समाजमाध्यमांवर टाकत त्याने गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पोलिसांचा खुशमस्कर्‍या म्हणून अग्रेसर असायचा. ही बाब गावातील नागरिकांना नेहमीच खटकत असे. सौरभने गैरफायदा घेत आपले उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे स्थानिक देवस्थानाचा आधार घेऊन व आपण वंशज असल्याचे दाखवून सौरभ लाखे हा ’लाखेस्वामी’ झाला. आडनावापुढे ’स्वामी’ लावून सामाजिक प्रतिष्ठा वाढविण्याचा त्याने प्रयत्न केला खरा, परंतु त्याच्या या राक्षसी कृत्याने त्याच्यासह कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. लाखेस्वामीच्या या क्रौर्याने केवळ शिऊर गावातील नव्हे, तर तालुक्यातील समाजमन हादरले आहे. अशा या असामाजिक प्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे, असा सूर उमटू लागला आहे.

..तर त्याने क्रौर्याची सीमा गाठली नसती

सौरभच्या प्रेमप्रकरणाची भणक गावात तर होतीच, परंतु हे प्रकरण शिऊर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. अंकिताच्या घरातील
सदस्यांनी तसे पोलिसांच्या कानावरही हा प्रकार घातला होता, परंतु सौरभच्या तत्कालीन पोलिस अधिकार्‍यांशी असलेल्या सलगीमुळे
त्यांनी त्याची पाठराखण केली. हे प्रकरण पोलिसांनी त्यावेळी संयमाने हाताळले असते, तर कदाचित ही घटना घडली नसती, परंतु सौरभची पोलिसांसोबत असलेली सलगी व हुजरेगिरीमुळे त्याला या प्रकरणात वचक बसण्याऐवजी आणखी उभारीच मिळाली आणि दिवसेंदिवस त्याची हिंमत वाढत गेली. त्याचाच परिपाक म्हणजे अंकिताचा आज निर्दयीपणे खून करण्यापर्यंत त्याची मजल गेली.

Back to top button