बीड : बोगस डॉक्टर पकडला; माजलगावमध्ये तहसील, आरोग्य पथकाची कारवाई | पुढारी

बीड : बोगस डॉक्टर पकडला; माजलगावमध्ये तहसील, आरोग्य पथकाची कारवाई

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : शहराजवळील पिताजी नगरी येथे दवाखाना चालवणार्‍या बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य अधिकारी व तहसीलच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी कारवाई केली. त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

शहराजवळील पिताजी नगरी भाटवडगाव परिसरात बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची माहिती येथील तालुका आरोग्य अधिकारी यांना मिळाली होती. गुरुवारी आरोग्य व तहसीलच्या पथकाने माहिती मिळालेल्या घरी छापा टाकला संजय मनोहर कुंभेफळकर(32) हा इसम वैद्यकीय व्यवसाय करताना आढळून आला. या पथकाने खोलीची पंचासमक्ष तपासणी केली असता अ‍ॅलोपॅथी औषधी, अँटीबायोटिक गोळ्या, सलाईन बॉटल इ.आढळून आली. सदर इसमास व्यवसायाबाबत प्रमाणपत्र दाखवण्यासाठी सांगितले मात्र त्याच्याकडे कुठले कागदपत्रे आढळून आले नाही. पथकाने पुन्हा वरील रुमची पाहणी केली असता तेथे 16 रुग्ण आढळून आले. यावरून वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय पारगावकर यांच्या तक्रारीवरून संजय मनोहर कुंभेफळकर याच्याविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या पथकात तालुका आरोग्य अधिकारी मधुकर घुबडे, वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय पारगावकर, नायब तहसीलदार अशोक भंडारे, शेषनारायण हातवटे आदी सहभागी होते.

Back to top button