परभणी : मुख्यमंत्र्यांची शिवसैनिकाला तातडीची दोन लाखांची मदत | पुढारी

परभणी : मुख्यमंत्र्यांची शिवसैनिकाला तातडीची दोन लाखांची मदत

परभणी, पुढारी वृत्तसेवा : आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कट्टर शिवसैनिकावर आलेल्या आरोग्याच्या महासंकटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्परता दाखवून केवळ मदतीची ग्वाहीच न देता, प्रत्यक्षात 2 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून वैद्यकीय उपचारासाठी संबंधित हॉस्पिटलला दिला.

महापालिकेचे शिवसेना नगरसेवक चंद्रकांत उर्फ चंदू शिंदे हे गेल्या महिनाभरापासून ब्रेन स्ट्रोकमुळे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थितीतून पुढे आलेले चंदू शिंदे हे विद्यार्थिदशेपासूनच शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असल्यामुळे मागील 2017 च्या पालिका निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. शिवसेनेचे गटनेते म्हणूनही त्यांनी पालिकेत काम पाहिले आहे. मात्र दरम्यानच्या काळात या कार्यकर्त्याला अचानक मेंदूविकार उद्भवला. आ. डॉ. राहुल पाटील यांच्यासह विविध पक्षांतील मित्रमंडळाने त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचारही सुरू केले. त्यांच्यावर महिनाभरात दोन शस्त्रक्रिया देखील झाल्या. नगरसेवक चंदू शिंदे यांच्या गंभीर आजाराची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक प्रवीण देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांना मुंबईत दिल्यानंतर त्याच क्षणी त्यांनी येथील उपचार करणार्‍या डॉक्टर्सशी फोनवरून विचारणा करीत सर्वत्तोपरी आर्थिक मदत दिली जाईल. उपचार सुरूच ठेवावे, असे सांगितले होते. मोबाईलवरून केवळ विचारणाच न करता मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आश् वासनाप्रमाणे तातडीने कारवाई करीत गुरूवारी (दि.11) मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून चंदू शिंदे यांच्या उपचारासाठी 2 लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर करीत ती संबंधित हॉस्पिटलच्या बँक खात्यावरही तातडीने जमा करून एका शिवसैनिकाला मदतीचा प्रत्यक्ष हात दिला.

Back to top button