औरंगाबाद : तोंडी तलाक देवून तिघींना घरातून हाकलले | पुढारी

औरंगाबाद : तोंडी तलाक देवून तिघींना घरातून हाकलले

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शहरात तोंडी तलाक दिल्याच्या तीन घटना मंगळवारी (दि. 9) उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी सातारा, उस्मानपुरा आणि जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

पहिली घटना सातारा परिसरात घडली. ‘मला तुझ्यासोबत राहायला लाज वाटते, तुझे नातेवाईक माझ्या लायकीचे नाहीत,’ असे बोलून पतीने पत्नीला तोंडी तलाक दिला. याप्रकरणी पतीवर सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मोहम्मद गफूर शेख असे पतीचे नाव आहे, तर सासरे मोहम्मद गफूर शेख, सासू रजिया गफूर शेख, नणंद हिना गफूर शेख (रा. शहाभोक्ता कॉलनी) अशी इतर आरोपींची नावे आहेत. मार्च 2021 ते 7 ऑगस्ट 2022 पर्यंत पतीसह सासरच्या मंडळींनी वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण केली, तर पतीने तीन वेळेस तलाक बोलून पत्नीला घराबाहेर काढले.

दुसरी घटना जिन्सी परिसरात घडली. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पती इमरान शेख उस्मान शेख, सासरा उस्मान शेख, सासू कैसरबी शेख (रा. घाटनांद्रा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 4 ते 5 ऑगस्टदरम्यान रोशन गेट, शरीफ कॉलनी येथे पतीसह सासरच्या मंडळींनी शिवीगाळ करून मारहाण केली. पती म्हणाला, ‘आता तुला माझी गरज नाही. मी तुला संभाळणार नाही. तुला सोडले,’ असे म्हणत इच्छा नसताना तोंडी तलाक दिला. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तिसरी घटना उस्मानपुरा परिसरात घडली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जहागीर खान शेरखान (रा. किराडपुरा) असे आरोपीचे नाव आहे. महिला व तिची आई 31 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पीरबाजार परिसरातील एका हॉटेलसमोरील एका झाडाखाली उभ्या होत्या. त्यावेळी त्या महिलेचा पती तेथे आला. दुचाकी उभी करत घरगुती कारणावरून त्याने वाद उकरून काढत पत्नीला शिवीगाळ सुरू केली. शिवीगाळ करता करता ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तीन वेळेस तलाक म्हणत ‘आता तू माझी पत्नी नाहीस,’ असे धमकावले. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button