उमेश कोल्हे प्रमाणेच कर्जतमध्ये हल्ला, हल्लेखोरांवर कठोर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही : नितेश राणे | पुढारी

उमेश कोल्हे प्रमाणेच कर्जतमध्ये हल्ला, हल्लेखोरांवर कठोर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही : नितेश राणे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे प्रतीक पवार या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नुपूर शर्मांचा फोटो डीपीला लावल्याने हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या तरुणावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तातडीने अटक करून या घटनेची एनआयएकडून चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे भाजप नेते नितेश राणे यांनी आज (दि.६) पत्रकार परिषदेत सांगितले.

कर्जत येथील प्रतीक पवार याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हे प्रकरण दाबण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की, अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरणासारखे कर्जतमध्ये प्रकरण घडले आहे. हल्ला करणाऱ्या हल्लखोरांना तत्काळ अटक करा. राज्यात आता आघाडीचे सरकार नाही, आता आम्ही जशाच तसे उत्तर देणार, असा इशारा राणे यांनी दिला.

हिंदू संघटनांच्या आग्रहानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, हिंदू देवदेवतांचा अपमान सहन करणार नाही, विटंबना केली तर सहन करणार नाही. आता हिंदुवरील हल्ले खपवून घेणार नाही. आम्हाला हात लावण्याची हिंमत करू नका. महाराष्ट्रात आता हिंदुत्ववादी सरकार आहे, अशा घटना पुन्हा घडल्यास आम्ही शांत बसणार नाही. हिंदुच्या रक्षणासाठी तिसरा डोळा उघडावा लागेल, हल्लेखोरांवर कठोर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.

Back to top button