हिंगोली : इसापूर धरणातून १९३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग | पुढारी

हिंगोली : इसापूर धरणातून १९३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : इसापूर धरणाचा आणखी एक दरवाजा शुक्रवारी (दि.२९) रोजी सकाळी आठ वाजता २० सेंटीमीटरने उघडण्यात आला आहे. धरणातून आता १९३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाण्याची होणारी आवक लक्षात घेता आणखी दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

उर्ध्वपैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणात मागील काही दिवसात पाणीसाठा वाढला आहे. ३१ जुलैपर्यंत निश्चित केलेल्या पाणीसाठ्याची पातळी ओलांडल्यामुळे प्रकल्प कार्यालयाने गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे दोन दरवाजे २० सेंटीमीटरने उघडून १२९५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. मात्र, धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. धरणात सध्या ९१.४३ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातून आणखी पाण्याचा विसर्ग करणे आवश्यक झाले.

शुक्रवारी (दि.२९) सकाळी आठ वाजता धरणाचा ८ क्रमांकाचा दरवाजा २० सेंटीमीटरने उघडण्यात आला आहे. आता धरणाच्या दरवाजा क्रमांक २, दरवाजा क्रमांक १४ व दरवाजा क्रमांक ८ या दरवाजामधून १९३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या धरणामध्ये पाण्याची आवक सुरू असून पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याचे प्रकल्प कार्यालयाचे कर्मचारी पप्पू मनवर यांनी सांगितले. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. नदी काठावरील तसेच पुरामुळे बाधित होणार्‍या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी एच. एस. धुळगंडे यांनी केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button