

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करीत असताना एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. संघपाल नरवाडे (26, रा. वसमत) असे या तरुणाचे नाव असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून तरुण वर्ग पोलीस भरतीचा सराव करीत आहेत. यामध्ये मैदानी चाचणीचा सराव, अभ्यासिकेत जाऊन लेखी परिक्षेचा अभ्यास केला जात आहे. शहरातील विविध ठिकाणी मैदानावर सुमारे 200 ते 250 तरुण सराव करतात. वसमत येथील संघपाल नरवाडे हा देखील मागील काही दिवसांपासून हिंगोली शहरात राहून पोलीस भरतीची तयारी करीत होता. बार्टी अंतर्गत उदय चॅरीटेबल ट्रस्टला उमेदवारांना भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचे काम देण्यात आले आहे. त्यानुसार दररोज सकाळी आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणी घेतली जाते.
नेहमी प्रमाणे गुरूवारी सकाळी संघपाल हा मित्रांसोबत मैदानावर धावण्याचा सराव करीत होता. यावेळी अचानक तो खाली कोसळला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला शासकिय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्याला शासकीय रुग्णालयात नेले असता वैद्यकिय अधिकार्यांनी त्याची तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
मृत संघपाल याच्या पश्चात आई, वडिल, भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रिपब्लिकन सेनेचे प्रदेश पदाधिकारी किरण घोंगडे यांनी तातडीने शासकीय रुग्णालयात धाव घेऊन माहिती घेतली. तसेच नरवाडे कुटुंबियांचे सांत्वन केले. मृत संघपाल याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी घोंगडे यांनी शासनाकडे केली आहे.
हेही वाचा