बीड : नादुरुस्त उभ्या सळईच्या ट्रकला आयशर ट्रक धडकून चालक ठार | पुढारी

बीड : नादुरुस्त उभ्या सळईच्या ट्रकला आयशर ट्रक धडकून चालक ठार

पाचोड; पुढारी वृत्तसेवा : नादुरुस्त अवस्थेत उभ्या असणाऱ्या सळईच्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या आयशर ट्रकची जोरदार धडक बसून आयशर  चालकाचा जागीच मृत्यू  झाला. ही दुर्घटना औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई (जि. बीड) बायपासवरील इंडियन आँईल पेट्रोल पंपासमोर सोमवारी रात्री दोन च्या सुमारास घडली. हमीद बन्नूभाई  पटेल (वय ३५, रा. कोळी, बोडखा ता. पैठण) असे मृत चालकाचे नाव आहे.

या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की जालन्याहून लोखंडी सळई घेऊन बीडकडे जाणाऱ्या  ट्रकचे (क्रमांक एमएच १४ बीजे०८५२) गेवराई बायपासजवळ एक्सेल तुटले. हा ट्रक रोडच्या बाजूला नादुरुस्त अवस्थेत उभा केला होता. दरम्यान, रात्री दोनच्या दरम्यान आयशर (क्रमांक एमएच २० डीई ४४३४)  हा औरंगाबादहून गूडवेज कंपनीचे नीन टायर  बीडमार्गे कर्नाटकडे  घेऊन जात होता. दरम्यान, गेवराई बायपासवर येताच चालकाला अंधारात समोरचा नादुस्त सळईचा उभा असलेला ट्रक दिसला नाही. आणि आयशर  पाठीमागून  येऊन सरळ जोरात  ट्रकला  धडकला.

आसपासच्या नागरिकांनी आवाज ऐकून  घटनास्थळी धाव घेत गेवराई पोलिसांना या दुर्घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त चालकास नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, आयशरच्या समोरील कँबीनध्ये लोखंडी सळई घुसल्याने त्याचा पूर्णपणे चुराडा झाला होता. तर चालक हमीद पटेल  हा स्टेअरींगमध्ये अडकला होता.

क्रेनच्या सहाय्याने केबीनमधून गंभीर जखमी चालकाला तब्बल दीड तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला गेवराईच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे असता  वैद्यकीय अधिकाऱ्याने  घोषित केले.  हमीद पटेल याच्या पश्चात आईवडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या  दुर्घटनेची नोंद गेवराई पोलीस ठाण्यात झाली आहे. तर नादुरुस्त उभे केलेल्या ट्रकच्या चालकाला अटक करण्यात आली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button