परभणी : उंडेगावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचली एसटी बस | पुढारी

परभणी : उंडेगावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचली एसटी बस

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या उंडेगावला स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी बसची सुविधा आजपासून (दि. २२) उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांसह नागरिकांची कोद्रीसह तालुक्याकडे पोहोचण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. गट शिक्षण अधिकारी बालाजी सगट, तथागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. मारोती साळवे, उंडेगावचे सरपंच सुशील केंद्रे यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून मानव विकास अंतर्गत ही बस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.

गंगाखेड शहरापासून २२ किलोमीटर अंतरावरील तालुक्याच्या डोंगरी भागाच्या मधोमध निसर्गरम्य वातावरणात सुमारे १४६० लोकसंख्या असलेले उंडेगाव आहे. स्वातंत्र्यानंतर उंडेगावला मजबूत रस्त्याअभावी एसटी बस सुरू झाली नव्हती. परिणामी उंडेगाव ते उंडेगाव पाटीपर्यंत २ किलोमीटरची पायपीट ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना करावी लागत होती. आता बस सुरू झाल्याने कोद्रीसह गंगाखेड शहरात जाण्याची सोय झाली आहे.

दरम्यान, आज सकाळी ९ वाजता उंडेगावला एसटी (क्रमांक एमएच 06 एस 8784) बस पोहोचली. उंडेगावचे सरपंच सुशील केंद्रे यांनी यावेळी वाहक व चालकांचा फेटे घालून सत्कार केला. तर महिलांनी एसटीला पुष्पहार घालून औक्षण केले. यावेळी मदन कातकडे, उपसरपंच रामेश्वर कातकडे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी सावंत, सूर्यकांत कातकडे, सदस्या गोदावरीबाई कातकडे, यशवंत कातकडे, भास्कर जायभाये, माणिक कातकडे, राम दराडे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button