बीड : केज – अंबाजोगाई रोडवर कार धडकेत दोनजण ठार | पुढारी

बीड : केज - अंबाजोगाई रोडवर कार धडकेत दोनजण ठार

केज (बीड); पुढारी वृत्तसेवा : केज – अंबाजोगाई रोडवर चंदन सावरगाव बस स्टँडजवळ ट्रक शेजारी उभे असलेल्या ड्रायव्हर आणि क्लिनर असलेल्या दोघांना एका कारने चिरडले. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १९ जुलै) रात्री ८:०० च्या दरम्यान घडली. मृत दोघे ही मुळचे उत्तर भारतीय आहेत. ताहेर हुसने आणि इस्माईल अशी मृतांची नावे आहेत. तर धडक देणाऱ्या कार मधील दोन जण जखमी झाले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, मंगळवारी (दि. १९ जुलै) रात्री ८:०० च्या दरम्यान अंबाजोगाईकडून केजच्या दिशेने येत असलेला राजस्थान येथील ट्रक क्र. (आर जे-११/जी बी-१०८६) हा चंदनसावरगाव येथील बस स्टँडवर रस्त्याच्याकडेला थांबला होता. ट्रकचे ड्रायव्हर व क्लिनर हे खाली उतरून ट्रकच्या टायर मधील हवा तपासून पहात होते. त्या वेळी अंबाजोगाईकडून केजकडे येत असलेली कारने (क्र.एम एच-४४/०५१२) रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर याना कारने चिरडले. या भीषण अपघातात ट्रक ड्रायव्हर व क्लिनर जागीच ठार झाले. त्यांना चिरडून नंतर ती कार रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात गेली. दोघांना चिरडलेल्या कार मधील प्रदीप अर्जुन मुंडे आणि रवि दिलीप मुंडे (दोघे रा. गोपाळपूर ता. धारूर) हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच जखमींना रुग्णवाहिकेतुन तात्काळ उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी आणण्यात आले.

Back to top button