औरंगाबाद : ‘गूगल’ कडून ‘संभाजीनगर’ असे नामकरण; केंद्राकडून शिक्कामोर्तब होण्याआधीच बदल | पुढारी

औरंगाबाद : 'गूगल' कडून 'संभाजीनगर' असे नामकरण; केंद्राकडून शिक्कामोर्तब होण्याआधीच बदल

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. या निर्णयाला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. पण त्याआधीच मंगळवारी गूगल मॅपने संभाजीनगर असे नामकरण करुन केल्याचे आढळून आले. या बदलामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

स्थानिक राजकारणात औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा गेली ३४ वर्षांपासून गाजत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी सुरूवातीपासूनच शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच करतात. आता राज्य सरकारनेही शहराच्या नामकरणावर शिक्कामोर्तब केला आहे. गेल्याच महिन्यात तत्कालीन ठाकरे सरकारने आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. मात्र, लगेचच नव्या स्थापन झालेल्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामकरणाच्या निर्णयास आधी स्थगिती दिली. मात्र नंतर औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला. आता हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्णया आधीच गूगलने केले नामांतर

केंद्राच्या मंजुरीनंतरच हे नामकरण होऊ शकणार आहे. पण त्याआधीच मंगळवारी गूगल या सर्च इंजिनने आणि त्यांच्या गूगल मॅप या सेवेने औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण केलेले दिसून आले. गूगल मॅपवर औरंगाबादऐवजी संभाजीनगर असा बदल करण्यात आला आहे. हे नाव फक्त इंग्रजीमध्ये टाकलेले आहे. गूगलकडून वेळोवेळी शहरांच्या तापमानाचा अलर्ट दिला जातो. त्यातही संभाजीनगर असाच उल्लेख आढळून येत आहे.

बदल गूगलकडून नव्हे, युजर्सकडून

दरम्यान, शहराच्या नामकरणाचा बदल गूगल कंपनीकडून झालेला नसून तो इंटरनेट वापरकर्त्यांकडून (यूजर्स) करण्यात आलेला आहे, असा दावा करण्यात आला आहे. एका जाणकाराने दिलेल्या माहितीनुसार, गूगल स्वत: कोणतीही माहिती भरत नाही किंवा त्यात बदल करत नाही. तर त्यांचे वापरकर्तेच वेळावेळी असे काही नवीन बदल करत योगदान देत असतात. गूगल मॅपवर गेल्यावर उजव्या कोपऱ्यात तीन डॉट दिसतात. त्यावर क्लिक केल्यावर सजेस्ट आणि एडीट असे दोन ऑप्शन येतात. त्यावर क्लिक करुन कुणीही नावात बदल करु शकतो किंवा नवीन नाव देऊ शकतो, असे एका जाणकाराने सांगितले आहे.

हेही वाचा

Back to top button