हिंगोली : सेनगावात खासदार हेमंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन | पुढारी

हिंगोली : सेनगावात खासदार हेमंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

सेनगाव; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील शिंदे गटात सामील झाल्याच्या निषेधार्थ सेनगाव येथील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हेमंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्‍यात आले. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.१९) सेनगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असलेले हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील आता शिंदे गटात सामील झाले आहेत. याआधी कळमनुरीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांनी स्वतः एकनिष्ठ किंबहुना बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक असल्याचा वारंवार खुलासा केला हाेताच पण, अचानक एका दिवसातच त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहातील मीटिंगमध्ये त्यांनी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा भरघोस मताने निवडून आणायचे आहे, असा निर्धार व्यक्त केला होता. काही दिवसातच खासदार हेमंत पाटील शिंदे गटात दाखल झाले आहेत.

त्यामुळे हे सर्व नियोजित असल्याचे जिल्हाभर चर्चा होत आहे. त्यामुळे एका पाठोपाठ होत असलेले बंड हे निष्ठावान शिवसैनिकांना मान्य नसल्यामुळे आज हेमंत पाटील यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी रणजित देशमुख, दिलीपराव कुंदरगे, जगदीश गाढवे तालुकाप्रमुख युवासेना करण देशमुख, प्रवीण महाजन, गंगाराम जी फटांगळे, दिगंबर देशमुख, निलेश राठोड, वसंता कुंदर्गे, फिरोज पठाण, सचिन जाधव, विलास सुतार आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button