औरंगाबाद : रस्त्याच्या खड्ड्यात रुग्‍णवाहिका उलटून डॉक्‍टर आणि चालक जखमी | पुढारी

औरंगाबाद : रस्त्याच्या खड्ड्यात रुग्‍णवाहिका उलटून डॉक्‍टर आणि चालक जखमी

देवगांव रंगारी (औरंगाबाद), पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील हतनूर येथून देवगाव रंगारी येथे येत असलेली रुग्‍णवाहिका रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे उलटुन रस्त्याच्या खाली जावून उलटली. या अपघातात डॉक्‍टर आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.१६) रोजी दुपारी चारच्या दरम्यान देवगाव रंगारी रस्त्यावरील धरणाच्या भिंती जवळ घडली. यात रूग्नवाहिकेचे नुकसान झाले आहे. रस्त्या लगतच्या शेतकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना दवाखान्यात दाखल केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान मौजे शेवता येथील सत्तर वर्षीय वयोवृध्द कचरु लक्ष्मण पवार यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खराब होत असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यासाठी नातेवाईकांनी रूग्नवाहिकेला फोन केला होता. त्‍यानंतर हतनुर (तालुका कन्नड) प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्नवाहिका पाठवण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.

दरम्यान, सदरील डॉ. पुंडलिक दुधा चव्हाण (वय ३४, ता. कन्नड), चालक सुनील दगडू जाधव (वय २५, रा.शिवुर) हे दोघेही रूग्नवाहिका  ( क्र. महा १४जी.यु.९९६५) तात्काळ घेऊन गल्लीबोरगांव मार्गे देवगावरंगारीकडे येत असतानाच देवगाव रंगारी लघु प्रकल्प धरणाच्या भिंती जवळ रस्त्यावरील पावसाच्या पाण्याने तुंबलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटुन रुग्नवाहिका तीन ते चार पलटी खात रस्त्याच्या बाजुला झाडावर जावून आदळली.

दुतर्फी शेतात काम करणारे शेतक-यांनी सोमनाथ शहाणे, अस्लम पठाण, गणेश जाधव, अनिल मालकर, गणेश मुंजाळ यांनी घटना स्थळी धाव घेत रुग्नवाहिकेची काच फोडून गंभीर जखमी चालक व डॉक्टरांना बाहेर काढले. ही माहिती मिळताच देवगाव रंगारी येथील रुग्णावाहिकेवरील दुसरे चालक संपत नाईक, कमलाकर चौधरी यांनी दुसरे वाहन घेत शेतकऱ्यांच्या मदतीने दोघाही जखमीना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्‍यान पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, या प्रकरणी देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Back to top button